गोराईकर सुविधांपासून वंचित, आयुक्तांनी घेतला आढावा

महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मंगळवारी सकाळी गोराई भागाला भेट दिली. चार तासांच्या या भेटीमध्ये त्यांनी स्मशानभूमीची असलेली गैरसोय, दवाखान्यांमध्ये असलेला अपुरा कर्मचारी वर्ग, प्रसुतीगृह आणि रुग्णालयाची तसेच रुग्णवाहिकेची असलेली गरज आणि शाळेची आवश्यकता आदींची पाहणी केली.

SHARE

गोराईतील कोळीवाडे, आदिवासी पाडे तसेच गावठाणांमधील विविध समस्यांबाबत मागील आठवड्यात काँग्रेसचे माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी आणि नगरसेविका श्वेता कोरगावकर यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर आठच दिवसांत आयुक्तांनी गोराईला मंगळवारी भेट दिली. यावेळी गोराईकरांना स्मशानभूमीच्या सुविधेसह दवाखाना आणि शाळेची व्यवस्था त्वरीत उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी, असे आदेश आयुक्तांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले आहेत.


वीजेची सोय नाही

बोरिवली पश्चिम येथील गोराई गाव हे अद्यापही सोयीसुविधांपासून वंचित असून या ठिकाणी पॅगोडा, एस्सेलवर्ल्ड, वॉटरकिंगडम, गोराई चौपाटीसारखी पर्यटन स्थळे असल्यामुळे अनेक देशी, विदेशी पर्यटक येत असतात. तरीही येथील कोळी बांधव आणि आदिवासी पाड्यातील रहिवाशांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. गोराईतील जुईपाडा, जामझाड पाडा, हाऊदपाडा, छोटी डोंगरी, मोठी डोंगरी, बाबरपाडा, आंबेडकर नगर आदी भागांमध्ये आजही दिवाबत्तीची सोय नाही.


५ वर्षांपासून पाठपुरावा 

गोराईत स्मशानभूमीसह प्रसूतीगृह आणि शाळेची गैरसोय होत असल्यामुळे या सुविधांसाठी काँग्रेसचे माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांनी मागील पाच वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर काँग्रेसच्या नगरसेविका श्वेता कोरगावकर यांनीही याबाबत पाठपुरावा सुरु ठेवला असून त्याप्रमाणे येथील रहिवाशी आणि चर्चचे फादर यांच्या उपस्थितीत त्यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन चर्चा केली होती. यावेळी आयुक्तांनी आपण स्वत: पाहणी करण्यास येणार असल्याचं आश्वासन या शिष्टमंडळाला दिलं होतं.


समस्यांवर कार्यवाहीचे अादेश 

आयुक्तांनी मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास या भागाला भेट दिली. तब्बल चार तासांच्या या भेटीमध्ये त्यांनी स्मशानभूमीची असलेली गैरसोय, दवाखान्यांमध्ये असलेला अपुरा कर्मचारी वर्ग, प्रसुतीगृह आणि रुग्णालयाची तसेच रुग्णवाहिकेची असलेली गरज आणि शाळेची आवश्यकता आदींची पाहणी केली. याबरोबरच गोराईकरांना होत असलेल्या पाणी समस्येचाही त्यांनी आढावा घेतला. तसेच गोराई चौपाटीची स्वच्छता आणि सुरक्षेचीही माहिती घेतली. याबाबत त्वरीत कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्तांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांनी दिली. यावेळी उपायुक्त अशोक खैरे, रमेश पवार, आर-मध्य विभागाचे सहायक आयुक्त रमाकांत बिरादर तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.


आयुक्तांकडून गंभीर दखल 

मागील अर्थसंकल्पीय भाषणात श्वेता कोरगावकर यांनी स्मशानभूमीबरोबरच आरोग्य सुविधांपासून गोराई गाव कसं वंचित आहे, याचा पाढा वाचला होता. यावेळीही आयुक्तांनी गोराईकरांना स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि यासाठी तरतुद करण्यात येईल, असं सांगितलं होतं. त्यामुळे आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत गोराईकरांच्या समस्या जाणून घेत यामध्ये जे अडथळे आहेत, ते दूर करण्याचे आदेश दिल्यामुळे गोराईकरांच्या समस्या लवकरच सुटतील, असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.हेही वाचा-

मीरा रोडमधील जवान सीमेवर शहीद

दिव्यांगांच्या बैठकीत धुडगूस, जोशी सरही झाले हैराण
संबंधित विषय
ताज्या बातम्या