Advertisement

शिवसेनेचा सभात्याग, आयुक्तांनी केले झाडांचे प्रस्ताव मंजूर


शिवसेनेचा सभात्याग, आयुक्तांनी केले झाडांचे प्रस्ताव मंजूर
SHARES

महापालिका आयुक्तांना कमाल 25 झाडे कापण्यास परवानगी देण्याचा अधिकार असतो. पण याच कायद्यात बदल करा, अशी मागणी करत सभागृहनेत्यांनी नगरसेवकांसह सभात्याग केला. परंतु भाजपासह इतर सदस्य असल्यामुळे आयुक्तांनी कामकाज पुढे चालू ठेवत काही प्रस्तावांना मंजुरी दिली. विधिमंडळात हा कायदा झालेला असताना यशवंत जाधव यांनी हा अध्यादेश रद्द करण्याची मागणी केल्यामुळे सभागृह नेत्यांच्या कच्च्या सामान्य ज्ञानामुळेच हा घोळ उडाला असल्याचे बोलले जात आहे.

महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत प्रारंभीचे अध्यक्ष असलेले महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी विधिमंडळात कायदा केल्याप्रमाणे कमाल 25 झाडे कापण्याचा प्रस्ताव आयुक्तांच्या अर्थात आपल्या अधिकारात येत आहे. या कायद्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे निवेदन केले. याबाबतच्या प्रस्तावाला यापूर्वीच मान्यता देण्यात आली असून यापुढे याप्रमाणे अंमलबजावणी केली जाईल, असे सांगितले. परंतु याला सभागृहनेते यशवंत जाधव यांनी आपला या ‘जीआर’ला विरोध असून आपण यात बदल केला पाहिजे, तुम्ही त्यात बदल करा, असे सुचवले. यावर आयुक्तांनी हा जीआर नसून कायदा आहे. त्यात मला बदल करण्याचा अधिकार नसून आपण विधिमंडळात आपल्या आमदारांना सांगून बदल करायला लावू शकता, असे सांगितले. परंतु यावर समाधान न झालेल्या जाधव यांनी याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या सदस्यांसह सभात्याग केला. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन यशवंत जाधव यांनी आम्ही सभात्याग केल्यानंतर गणसंख्या (कोरम) नसताना आयुक्तांनी सभा चालवून प्रस्ताव मंजूर केले. त्यामुळे याबाबत विधी खात्याचे अभिप्राय घेण्यात याव्यात अशी मागणी लेखी पत्राद्वारे केली आहे. मागील बैठकीत यशवंत जाधव यांनी सर्व प्रस्ताव रोखून धरले होते. परंतु महापालिकेच्या विकास कामांमध्ये येणारी एक ते दोन झाडांचे प्रस्तावही रोखले जात असल्यामुळे आयुक्तांनी हे निवेदन केल्याचे सांगितले जाते.


हेही वाचा

रस्त्याच्या कामाचा पत्ता नाही, पण झाडांची कत्तल मात्र जोरात


भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी मात्र, यशवंत जाधव यांच्या सभात्यागाची खिल्ली उडवली आहे. यशवंत जाधव यांचे सामान्य ज्ञानच कमी आहे. कारण ते ज्या जीआरला आपला विरोध असल्याचे सांगत आहेत, तो जीआर नसून कायदा केलेला आहे. विधिमंडळात हा कायदा केलेला आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम जे शिवसेनेचे नेते आहेत, त्यांनी हे विधेयक मांडल्यानंतर हा कायदा बनलेला आहे. मग शिवसेनेचे मंत्री कायदा करतात आणि महापालिकेचे सभागृहनेते त्याला विरोध करतात. ही विसंगती असून त्यांनी याबाबत पर्यावरण मंत्री आणि आमदारांना सांगून या कायद्यात बदल करावा. जाधव यांची मागणी आम्हाला पटलेली नाही. ती मान्य करण्यासारखीही नव्हती, म्हणून आम्ही बसून राहिलो. परंतु यामध्ये एकच झाड कापण्याचा प्रस्ताव मंजूर झाला असल्याचे कोटक यांनी सांगितले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा