Advertisement

आता पावसाळ्यात हार्बर मार्ग तुंबणार नाही! कल्व्हर्टचं होणार रूंदीकरण!


आता पावसाळ्यात हार्बर मार्ग तुंबणार नाही! कल्व्हर्टचं होणार रूंदीकरण!
SHARES

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर कुर्ला, चुनाभट्टी आदी ठिकाणी पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होत असते. या समस्येवर आता महापालिकेने उपाय शोधून काढला असून हार्बरच्या रेल्वे मार्गाखालून जाणाऱ्या मोऱ्या (कल्व्हर्ट) यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. या मार्गावर एकूण ११ मोऱ्या असून त्यातील सात मोऱ्यांच्या रुंदीकरणाचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात या मोऱ्यांचे काम पूर्ण झाल्यास कुर्ला, चुनाभट्टी आदी ठिकाणी रेल्वे मार्गांवर पावसाचे पाणी साचून गाड्या बंद होण्याचे प्रकार कमी होतील.


अनेक ठिकाणी कामे प्रगतीपथावर

२६ जुलैच्या महापुरानंतर महापालिकेने शासनाने नियुक्त केलेली सत्यशोधन समिती (माधव चितळे) आणि ब्रिमस्टोवॅड सल्लागाराने केलेल्या शिफारशीनुसार मुंबईतील विविध नाल्यांच्या व नद्यांच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. ही सर्व कामे प्रगतीपथावर आहेत. परिमंडळ पाचमधील कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, देवनार आदी भागातील नाल्यांचे रुंदीकरण, खोलीकरण, सुधारणा तसेच पावसाळी गटारांची पुनर्रचना करण्याचे काम हाती घेण्यात आले आहेत.


११ पैकी ७ मोऱ्यांचे होणार रूंदीकरण

या पर्जन्यवाहिन्या काही ठिकाणी कुर्ला-ट्रॉम्बे वाशी रिफायनरी रेल्वे लाईनला ओलांडून जातात. या रेल्वे मार्गाखालून एकूण ११ मोऱ्या अस्तित्वात आहेत. मात्र, या ११ मोऱ्यांपैकी ७ मोऱ्यांचे रुंदीकरण करण्याची शिफारस ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाचे सल्लागार एम.डब्ल्यू, एच प्रायव्हेट यांनी केली आहे. त्यानुसार रेल्वे हद्दीतील या सात मोऱ्यांचे रुंदीकरण करण्यासाठी मध्य रेल्वेला ५७.१७ कोटी रुपयांची रक्कम अदा केली आहे. यामध्ये पाच मोऱ्या पूर्व उपनगरातील असून दोन मोऱ्या शहर भागातील आहेत. रेल्वे हद्दीतील कामे ही रेल्वे प्रशासनाकडूनच करून घेणे आवश्यक असल्यामुळे या कामांच्या खर्चाचा निधी रेल्वेला देण्यात आल्याचे पर्जन्य जलअभियंता विभागाने स्पष्ट केले आहे.


पावसाळ्यात बसतो हार्बरला फटका

मागील पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबून रेल्वे गाड्या बंद पडल्या. यामध्ये हार्बर मार्गावरील कुर्ला, चुनाभट्टी येथे रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने लोकल बंद झाल्या होत्या. लोकलमध्ये अडकलेल्यांना रेल्वे मार्गावर तुंबलेल्या पाण्यामुळे बाहेर पडता येत नव्हते. अखेर अग्निशमन दलाला पाचारण करून लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढावे लागले होते.


या मोऱ्यांचे होणार रुंदीकरण

० कुर्ला नेहरु नगर, बंटर भवन
 चरई नाला
 वडवली नाला
 रिफायनरी दक्षिण ए नाला
 रिफायनरी साऊथ नाला
 चुनाभट्टी नाला
 वडाळा नाला


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा