Advertisement

वांद्र्याचा बाझार रोड होणार ३० फुटांचा!

'बाझार रोड' कात टाकत असून या मार्गातील सर्व अतिक्रमणांवर महापालिकेने धडक कारवाई केली आहे. त्यामुळे केवळ १० फुटांपर्यंत अाकसलेला हा रस्ता आता ३० फुटांपर्यंत रुंद होणार आहे.

वांद्र्याचा बाझार रोड होणार ३० फुटांचा!
SHARES

वांद्रे पश्चिमेकडील एस. व्ही. रोडवरून लकी हॉटेल शेजारून जाणारा 'बाझार रोड' तसा अत्यंत दाटीवाटीचा. एकेकाळच्या मोकळ्या रस्त्याला अतिक्रमणांमुळे गल्लीचं रुप आलं आहे. या गल्लीवजा रस्त्यावरून पादचारी आणि वाहनचालकांना चालणंदेखील जिकरीचं बनलं आहे. पण आता 'बाझार रोड' कात टाकत असून या मार्गातील सर्व अतिक्रमणांवर महापालिकेने धडक कारवाई केली आहे. त्यामुळे केवळ १० फुटांपर्यंत अाकसलेला हा रस्ता आता ३० फुटांपर्यंत रुंद होणार आहे.


सर्व बांधकामांवर कारवाई

वांद्रे पश्चिमेकडील बाझार रोड आणि त्यापुढील ए. एस. सावंत मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने येथील सर्व बांधकामांवर गुरुवारी कारवाई करण्यात आली. एच-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत एकूण ४२ अतिक्रमित बांधकामांवर कारवाई करून या रस्त्याची वाट मोकळी करून दिली आहे. बाझार रोड हा वाहतुकीच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा मानला जातो.


लवकरच वाहतुकीसाठी खुला

अतिक्रमणांमुळे रस्त्यांची रुंदीच कमी झाली होती. त्यामुळे या रस्त्यांची रुंदी वाढवण्यासाठी सर्व अतिक्रमित बांधकामांवर कारवाई करण्यात आली. आता रस्ता मोकळा झाल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल. हा संपूर्ण रस्ता ३० फुटापर्यंत रुंद करण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली. या कारवाईत वांद्रे पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासह २ जेसीबी आणि ३ लॉरी आदींच्या मदतीने महापालिकेचे ८ अधिकारी, ३२ कामगारांनी भाग घेतला होता.


लांबचा प्रवास होणार कमी 

बाझार रोडवरील या अतिक्रमणांमुळे अनेकदा रिक्षा चालक हा मार्ग टाळून लिंकिंग रोडवरून आत शिरत पुढील मार्गाचा वापर करत असत. त्यामुळे प्रवासी आणि रिक्षांना लांबचा प्रवास करावा लागत होता. पण भविष्यात हा लांबचा प्रवास कमी होणार आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा