कंत्राटदारांकडील रकमेचा शोध एका चुटकीत

 CST
कंत्राटदारांकडील रकमेचा शोध एका चुटकीत
CST, Mumbai  -  

मुंबई - मुंबई महापालिकेतील कंत्राटदारांकडून विविध विकासकामे केली जातात. पण ही विकास कामे करताना कंत्राटदारांची पाच टक्के अनामत रक्कम राखीव ठेवली जाते. परंतु लेखा विभागाने आता यासाठी संगणकीय सॉफ्टवेअर सुरू केले आहे. त्याद्वारे कोणत्या कंत्राटदाराची किती रुपयांची ठेव आहे, याची माहिती आता चुटकी सरशी मिळणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटदारांना त्यांनी केलेल्या कामाच्या हमी कालावधीनंतर कंत्राट ठेव आणि कामाच्या रकमेच्या पाच टक्के राखून ठेवलेली रक्कम परत दिली जाते. कंत्राटदाराने केलेल्या इतर कामांच्या अनुषंगाने काही रक्कम बाकी आहे का? याची तपासणी करण्यासाठी महापालिकेच्या सर्व विभाग आणि खात्यांकडे पत्र पाठवून विचारणा करण्याची आतापर्यंतची पद्धत होती. यामुळे काही प्रकरणात ही माहिती मिळण्यास विलंब होत असे. ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने 'इआरपी सॉफ्टवेअर' (SAP) आणले आहे. यामुळे योग्यप्रकारे काम करणा-या आणि हमी कालावधीत योग्य सेवा देणाऱ्या कंत्राटदारांना त्यांची रक्कम तात्काळ मिळू शकणार आहे. तर काम योग्यप्रकारे न करणा-या कंत्राटदारांच्या जमा रकमेतून आवश्यक ती रक्कम आणि दंड कापून घेणे सुलभ होणार आहे, अशी माहिती प्रमुख लेखापाल हरिभाऊ निकम यांनी दिली आहे.

Loading Comments