सानुग्रह अनुदानाचा निर्णय ९ ऑक्टोबरपूर्वी घ्या, महापालिका कामगार संघटनांचा इशारा


SHARE

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याच्या मागणीसाठी काढलेला मोर्चात कामगार नेत्यांच्या पदरी अश्वासनाशिवाय काहीच पडले नाही. महापालिकेत कामगार संघटनांचे अस्तित्व संपत चालले असून पुन्हा एकदा कामगार संघटनांनी आपली ताकद वाढवण्यासाठी एकत्र येत समन्वय समिती गठीत केली आहे. त्यामुळे ‘आमच्याशी चर्चा करा आणि मगच निर्णय घ्या’ या एकाच मागणीवर कामगार संघटनांचे नेते अडून बसले आहेत. ९ ऑक्टोबरपूर्वी निर्णय न घेतल्यास १० तारखेला पुन्हा मोर्चा काढला जाईल, असा इशारा महापालिका कामगार संघटनांच्या समन्वय समितीने दिला असून आता या इशाऱ्याला आयुक्त किती भीक घालतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.


आझाद मैदानात मोर्चा

मुंबई महापालिकेतील ४० कामगार संघटनांनी एकत्र येऊन समनव्यय समिती गठीत केली आहे. या समन्वय समितीने कामगार कर्मचाऱ्यांचे सानुग्रह अनुदान, बायोमेट्रीक हजेरी, गटविमा, यांत्रिक झाडू आणि कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून होणारे खासगीकरण आदी प्रमुख मुद्द्याबाबत महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चासाठी आझाद मैदानात सुमारे ५ ते ६ हजार कामगार उपस्थित होते. कामगार संघटनांच्या नेत्यांनी मात्र १० ते १५ हजार कामगार उपस्थित असल्याचा दावा केला आहे.


४० हजार रु. सानुग्रह अनुदान

या समन्वय समितीतील महाबळ शेट्टी, अॅड. प्रकाश देवदास, बाबा कदम आदींसह कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन ४० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली. आयुक्तांनी कामागारांच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेऊन येत्या ९ ऑक्टोबरपर्यंत निर्णय कळवण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.


महापौरांनाही निवेदन

याबाबतचे निवेदन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनाही दिले असून त्यांनीही येत्या ७ ऑक्टोबरला गटनेत्यांची सभा बोलावून याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याचे सांगितले. गटनेत्यांच्या बैठकीनंतर सर्व कामगार संघटनांसोबतच बैठक घेण्यात येईल, असेही महापौरांनी आश्वासन दिल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


ताकद दाखवणार

आयुक्त आणि महापौरांसोबत झालेल्या बैठकीनंतर या शिष्टमंडळाने आझाद मैदानात जावून कामगारांना संबोधित केले. त्यानुसार ७ तारखेपर्यंत सानुग्रह अनुदानाचा निर्णय येणे अपेक्षित आहे. परंतु आयुक्तांनी ९ ऑक्टोबरची तारीख दिली आहे. पण या ९ ऑक्टोबरपर्यंत त्यांनी याबाबत कामगार संघटनांशी चर्चा न करता निर्णय घेतल्यास पुन्हा एकदा मोर्चा काढून कामगारांची ताकद दाखवून दिली जाईल, असा इशारा प्रशासनाला संघटनांनी दिला.


या संघटनांचा समावेश

मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीमध्ये म्युनिसिपल मजदूर युनियन मुंबई व संलग्न संघटनेचे अॅड. महाबळ शेट्टी, अॅड. सुखदेव काशिद, रमाकांत बने, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे बाबा कदम, सत्यवान जावकर, मुंबई महापालिका कार्यालयीन कर्मचारी संघटना मुंबई महापालिका कर्मचारी महासंघ अॅड. प्रकाश देवदास, बा.शि.साळवी, अनिल ढुमणे, बृहन्मुंबई महापालिका कामगार कर्मचारी महासंघाचे दिवाकर दळवी, सुभाष पवार, मुंबई महापालिका शिक्षक सभेचे रमेश जोशी, बृहन्मुंबई इंजिनीअर्स युनियनचे साईनाथ राजाध्यक्ष, मनपा शिक्षक सेनेचे के.पी. नाईक, महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे संदीप देशपांडे आदींसह ४० कामगार संघटनांचा समावेश आहे.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय