मुंबईतील मुलुंड डम्पिंग ग्राउंड हे शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यात आला. इथे असलेल्या 70 लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावली जात आहे. यासाठी संयुक्त भागीदारीत असलेल्या तीन कंत्राटदारांना सहा वर्षांत या डम्पिंग ग्राउंडमधील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम सोपवण्यात आले. मात्र आत्तापर्यंत अवघ्या 32 लाख मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यातच कंत्राटदाराला यश आले आहे.
या डम्पिंग ग्राउंडमधील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जून 2025 ची मुदत आहे. मात्र हे काम मुदतीत पूर्ण होऊ शकणार नसून उर्वरित कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आणखी वर्षभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना डम्पिंगचा त्रास आणखी काही महिने सहन करावा लागणार आहे.
मुदतीत कचरा विल्हेवाट लावण्यात अपयश येत असल्याने मुंबई महापालिकेने कंत्राटदाराला आत्तापर्यंत आठ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
प्रत्येक वर्षी 11 ते 12 लाख मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे उद्दिष्ट कंत्राटदाराला दिले होते. मात्र हे उद्दिष्ट कंत्राटदाराकडून पूर्ण होत नसल्याने महापालिकेने आत्तापर्यंत एकूण आठ कोटी रुपयांचा दंड कंत्राटदाराकडून वसूल केला आहे.
मुलुंड डम्पिंग ग्राउंडची कचरा साठवण क्षमता 70 लाख मेट्रिक टन आहे. या डम्पिंग ग्राउंडमधील कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्याचे काम सहा वर्षांसाठी कंत्राटदाराला देण्यात आले आहे.
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात काही महिने काम थांबल्याने कंत्राटदाराला मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे जून 2025 पर्यंत कचरा विल्हेवाटीची मुदत कंत्राटदाराला दिलेली आहे. यासाठी कंत्राटदारांसोबत प्रत्येक टनामागे 798 रुपये याप्रमाणे 558 कोटी रुपयांचा करारही केला आहे.
हेही वाचा