बोरीवली पश्चिम येथील आर.एम.भट्ट मार्ग आणि एस.व्ही.रोड जंक्शन ते कल्पना चावला चौक याठिकाणी होणारी वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी याठिकाणी उड्डाणपुलाचं काम हाती घेण्यात येत आहे. यासाठी पुलाच्या कामाला आता लवकरच सुरुवात केली जाणार असून या पुलासाठी सुमारे १६२ कोटी रुपये खर्च केलं जाणार आहे. त्यामुळे या पुलाचं बांधकाम झाल्यास बोरीवलीकरांचा प्रवास वेगाने होणार आहे.
बोरीवली पश्चिम येथील कोरा केंद्र येथील एस.व्ही. रोडवर उड्डाणपुलाचं बांधकाम करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याबाबत सल्लागार श्रीखंडे कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड आणि टीपीएफ इंजिनिअरिंग यांनी दिलेल्या आराखड्यानुसार महापालिकेने निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. या निविदेत चार कंत्राटदारांनी भाग घेतला होता. त्यामध्ये एमईपीएल-स्पेको (जे.व्ही) ही कंपनी पात्र ठरली आहे. यामध्ये सुमारे १६२ कोटी रुपये खर्च केलं जाणार आहे.
या उड्डाणपुलामुळे कांदिवली पोयसर, महावीर नगर, चारकोप, गोराई, चिकूवाडी या बोरीवली आणि कांदिवली पश्चिम भागातील रहिवाशांना दिलासा मिळेल. या भागातील नागरिकांना जो वाहतूक कोंडीचा त्रास होतोय, तो दूर होऊन एकप्रकारे सुलभ वाहतुकीची सोय होणार असल्याचं पूल विभागाचे प्रभारी प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी स्पष्ट केलं.
दक्षिण मुंबईतील केम्स कॉर्नर उड्डाणपुलाच्या दोन सांध्यांमध्ये असमतलपणा आहे. त्यामुळे हे पूल धोकादायक असल्याचा व्हिडिओही यापूर्वी व्हायरल झाला होता. परंतु सांध्यातील हा असमतलपणा बांधकाम केल्यापासून आहे, असं स्पष्टीकरण महापालिकेनं दिलं होतं. पुलावरील पृष्ठ भाग समांतर नसल्यानं बऱ्याचदा भरघाव वेगाने जाण्याच्या गाड्या आदळतात. त्यामुळे वाहनांना धक्का पोहोचतो. या पाश्र्वभूमीवर कुवैतच्या वाणिज्य दुताने महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना मागील महिन्यात पत्र पाठवून या पुलाची दुरुस्ती करण्याची सूचना केली.
विलेपार्ले येथील गोखले उड्डाणपुलावरील पादचारी पुलाचा भाग रेल्वे मार्गावर कोसळल्यानंतर हे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले. या पुलाच्या बांधकाम स्थैर्यतेची पडताळणी करण्यासाठी नेमलेल्या समितीने हे पूल धोकादायक असल्याचं म्हटलं आहे. त्यानुसार हे पूल पाडण्याची तयारी सुरू झाली आहे.
रेल्वेचे अधिकारी आणि महापालिका पूल विभागाचे प्रमुख अभियंता यांच्यात बैठक सुरू आहे. त्यामुळे हे पूल पाडायचं कसं? आणि कशाप्रकारे यासाठी नवीन सल्लागार नेमला आहे. याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यावर पूल पाडण्याची प्रक्रिया हाती घेतली जाईल, असं महापालिकेच्या पूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.
हे पूल एकाचवेळी पडता येणार नाही. टप्प्याटप्य्याने पाडता येईल. प्रथम एक बाजू पाडली जाईल आणि त्यानंतर दुसरी बाजू. जेणेकरून वाहतुकीची कुठेही कोंडी होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.