Advertisement

कोरोनाकाळात मृत्यू झालेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मुंबई महापालिका मदतीचा हात देणार


कोरोनाकाळात मृत्यू झालेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मुंबई महापालिका मदतीचा हात देणार
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, कोरोनाला आळा घालण्यासाठी दिवस रात्र मेहनत करणाऱ्या पालिकेच्या तब्बल २२८ कर्मचाऱ्यांना कोरोनामुळं जीव गमवावा लागला होता. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मुंबई महापालिकेतर्फे मदतीचा हात दिला जाणार आहे. यातील ९१ जणांच्या कुटुंबांना ५० लाखांची आर्थिक मदत तर ९० जणांच्या वारसांना नोकरी दिली जाणार आहे.

मुंबई महापालिकेनं नुकतंच याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. मुंबई महापालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोनानं शिरकाव केल्यानंतर काही दिवसांतच रुग्णसंख्या झपाट्यानं वाढू लागली. मुंबई महापालिकेच्या ६७६६ कर्मचाऱ्यांना दीड वर्षात कोरोनाची लागण झाली. यातील तब्बल ५८०३ कर्मचारी कोरोनाला हरवून पुन्हा आपल्या कर्तव्यावर हजर झाले आहेत.

मात्र तब्बल २२८ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळं मृत्यू झाला. कोविड डय़ुटी करताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडूनही आर्थिक मदत करण्यात येते. या पार्श्वभूमीवर पालिकेने आर्थिक मदतीसाठी २०० प्रस्ताव केंद्राकडेही पाठवले होते. मात्र यातील केवळ १९ प्रकरणांत केंद्राने ५० लाखांची मदत दिली आहे. तर उर्वरित कुटुंबांना आधार देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

यानुसार ९१ जणांच्या कुटुंबांना ५० लाखांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तर ९० जणांच्या वारसांना नोकरीही दिली जाईल, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, पालिकेचे ९६७ कर्मचारी अजूनही कोरोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोविड कामासाठी अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. शिवाय महापालिकेचे शेकडो कंत्राटी कर्मचारीही आहेत. यामध्ये कोविड ड्युटी करताना ९ कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे. यामध्ये कंत्राटी कामगार मृत्यू झालेले ३ प्रस्तावही केंद्राने मंजूर केले आहेत. तर उर्वरित सहा कर्मचाऱ्यांना पालिका आर्थिक मदत देणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा