SHARE

मुंबईतील अनेक भागांमध्ये आग लागण्याच्या दुघर्टना घडत असून या दुघर्टनांमध्ये आता प्रचंड वाढही होऊ लागली आहे. बऱ्याचदा आगीमध्ये बचाव कार्य करणाऱ्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना अापला जीव धोक्यात घालावा लागतो. त्यामध्ये बऱ्याचदा अग्निशमन दलाच्या जवानांना अापले प्राण गमवावे लागतात, काही वेळेला जखमीही व्हावं लागतं. यावर मात करण्यासाठी बचावात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून आता महापालिकेच्या वतीनं फायर रोबो खरेदी केला जाणार अाहे. लवकरच अग्निशमन दलाच्या दिमतीला हा रोबो सज्ज होणार आहे.


लवकरच मिळणार रोबो

महापालिकेचा अर्थसंकल्प मांडताना आयुक्त अजोय मेहता यांनी मुंबई अग्निशमन दलामध्ये फायर रोबोची खरेदी केली जाईल, असं आश्वासन दिलं होतं. मात्र, या आर्थिक वर्षांतच आयुक्तांनी हा रोबो अग्निशमन दलाच्या सेवेत दाखल करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामध्ये पात्र ठरलेल्या कंपनीकडून एक फायर रोबो खरेदी केला जाणार असून पुढील पाच वर्षांच्या देखभालीची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली जाणार आहे. यासाठी सुमारे ९२ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.


दोन जवान जखमी

मुंबई शहरात उत्तुंग इमारती, मल्टिप्लेक्स, चित्रपटगृहे, मॉल्स यांची बांधकामेही मोठ्या प्रमाणात सुरू अाहेत. अनेक इमारतींना ग्लास फसाड लावण्यात आलेलं आहे. परंतु यासर्व इमारतींमध्ये आग विझवण्याचं काम करताना अग्निशमन दलाच्या जवानांना जिकरीचे प्रयत्न करावे लागतात. मागील आठवड्यात लागलेल्या दोन आगींच्या घटनांमध्ये अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले होते. त्यामुळे अडचणींच्या ठिकाणी अशाप्रकारच्या रोबोचा वापर करून अग्निशमन दलाचे जवान बचावात्मक उपाययोजना राबवून आगींवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


जवानांसाठी फायदेशीर

उत्तुंग इमारती, मॉल्स व मल्टिप्लेक्समधील तळघरात बहुमजली वाहनतळे बांधली जात आहेत. अशा ठिकाणी आगीच्या दुर्घटना घडल्यास तळघरातील साठलेल्या धुरामध्ये जाऊन अाग विझविण्याचे काम करणे जवानांसाठी धोक्याचं बनतं. दहा वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्यावेळी अग्निशमन दलाला आग विझवण्याचं काम करावं लागलं. त्यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जिवीतास धोका निर्माण झाला होता. त्यामुळे अशाप्रकारच्या घटना घडल्यास या रोबोचा वापर करता येऊ शकतो, असं अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी स्पष्ट केलं.


या ठिकाणी होईल रोबोचा वापर

एवढंच नाही मुंबईमध्ये असलेले पेट्रोकेमिकल्स कारखाने किंवा अणुऊर्जा संशोधन केंद्र याठिकाणी आगीची घटना घडल्यास तिथे बचावकार्य राबवणे धोकादायक असतं. काही दिवसांपूर्वी बूचर बेटावर लागलेल्या आगीच्यावेळी अग्निशमन दलातील अधिकारी व जवानांनी अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये काम करावं लागलं होतं. त्यामुळे अशाप्रकारची परिस्थिती उद्भवल्यासही रोबोटचा वापर करता येऊ शकतो.


रिमोट कंट्रोलद्वारे अाग विझवणार

मुंबईतील गोकुळ इमारत आग दुघर्टनेत आग विझवण्यास आतमध्ये गेलेले अधिकारी मृत्यूमुखी पडले होते. मुंबईत अनेक जुन्या तसेच मोडकळीस आलेल्या इमारतीत आग लागल्यास, त्या इमारती कोसळण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे अशाप्रकारच्या जुन्या इमारतींमध्ये लागल्यास तेथील धोका लक्षात घेता या रोबोटचा वापर करता येवू शकतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सुरक्षित अंतरावरून रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने फायर रोबोद्वारे अाग विझवता येते, असंही प्रभात रहांगदळे यांनी स्पष्ट केलं.


हेही वाचा -

अग्निशमन दलासाठी 'बूस्टर'; ड्रोन, रोबोट्सची खरेदी


संबंधित विषय
ताज्या बातम्या