Advertisement

'रात्रीही होणार दादरमधील फेरीवाल्यांवर कारवाई'


'रात्रीही होणार दादरमधील फेरीवाल्यांवर कारवाई'
SHARES

फेरीवाल्यांवर सुरू असलेल्या कारवाईनंतरही दादर पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर रात्रीच्या वेळेस फेरीवाले तसेच खाद्यपदार्थ विक्रेते बसत असल्याच्या तक्रारी मिळत आहेत. त्यामुळे महापालिकेचं अतिक्रमण निर्मूलन पथक रात्रीही कार्यरत राहणार आहे. यासाठी एकट्या दादर भागासाठी ४ अतिरिक्त परवाना निरीक्षकांची संख्या वाढवण्यात येणार आहे. सध्या इथं ६ परवाना निरीक्षक असून ही संख्या १० एवढी करण्यात येणार आहे. 


फेरीवाल्यांविरोधात कडक कारवाई

फेरीवाल्यांविरोधात महापालिकेच्यावतीने धडक कारवाई करण्यात येत असून रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर तसेच शाळा, महाविद्यालय, मंदिर, महापालिका मंडई आदींपासून १०० मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास बंदी आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार फेरीवाल्यांविरोधात ही कडक कारवाई केली जात असली तरी पहिल्या आणि दुसऱ्या पाळीतील अतिक्रमण निर्मूलन पथकाची वेळ संपल्यानंतर फेरीवाले पुन्हा इथल्या पदपथांवर येऊन बसत असल्याचं दिसून येत आहे.रात्रीही कडक कारवाई

पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकाबाहेरच फेरीवाले गॅस पेटवून त्यावर वडे आणि भजी तळून विक्री करत आहेत. याशिवाय पुलाव, अंडा ऑम्लेट या खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या गाड्याही लागलेल्या असतात. याशिवाय केशव सूत उड्डाणपुलाच्या खालीही फळ विक्रेते, भाजी विक्रेत तसेच अन्य वस्तूंचे विक्रेते बसून धंदा करत आहेत. पण या फेरीवाल्यांनी बसू नये म्हणून नेमण्यात आलेले खासगी सुरक्षा रक्षकही बिनकामाचे ठरले असून पोलिसही या फेरीवाल्यांकडं दुर्लक्ष करत त्यांना एकप्रकारे फेरीचा धंदा करण्यास प्रोत्साहन देत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे अखेर महापालिकेनं आता या परिसरावर रात्रीच्यावेळीही कडक कारवाई करण्यासाठी परवाना निरीक्षकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.


कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणार

दादर रेल्वे स्थानकाबाहेर रात्री ९ वाजता दुसऱ्या पाळीतील कर्मचाऱ्यांची वेळ संपल्यानंतर फेरीवाले बसत आहेत. ही बाब आपल्या निदर्शनास आणून दिली असून यासाठी आपण ४ अतिरिक्त परवाना निरीक्षकांची संख्या वाढवून देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार अतिरिक्त आबासाहेब जऱ्हाड आणि उपायुक्त (अतिक्रमण निर्मुलन) निधी चौधरी यांनी ४ परवाना निरीक्षक देण्याचं मान्य केलं आहे. त्यानुसार हे ४ निरीक्षक आल्यानंतर रात्रीही कडक कारवाई करण्यात येईल.

त्यामुळे रात्रीही दादर रेल्वे स्थानक हे फेरीवालामुक्तच दिसेल, असं जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादर यांनी स्पष्ट केलं. सध्या जी-उत्तर विभागात ६ परवाना निरीक्षक आहेत. ही संख्या आता दहापर्यंत वाढवली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा