मिठीचं उगमस्थान झालं मोकळं, अनधिकृत झोपड्यांच्या विखळ्यातून सुटका

  मागील ८ ते ९ वर्षांपासून मिठी नदीच्या उगमस्थानाला झोपड्यांनी विळखा घातला होता. अखेर या झोपड्यांवर बुलडोझर चढवून मिठीचं मुख मोकळं करण्यात आलं.

  Powai
  मिठीचं उगमस्थान झालं मोकळं, अनधिकृत झोपड्यांच्या विखळ्यातून सुटका
  मुंबई  -  

  मरोळ बामनदायापाडा येथील मिठीनदीवरील झोपड्या हटवल्यानंतरा मिठी नदीचं उमगस्थान असलेल्या फिल्टरपाडा येथील झोपड्याही तोडण्यात महापालिकेला यश आलं आहे. मागील ८ ते ९ वर्षांपासून मिठी नदीच्या उगमस्थानाला झोपड्यांनी विळखा घातला होता. अखेर या झोपड्यांवर बुलडोझर चढवून मिठीचं मुख मोकळं करण्यात आलं. कुर्ला येथील किस्मतनगरच्या झोपड्या हटवल्यास खऱ्या अर्थाने मिठी अतिक्रमण मुक्त होणार आहे.


  ४ दिवसांपूर्वी कारवाई

  महापालिकेच्या 'एस' विभागाच्या हद्दीतील पवई फिल्टरपाडा येथील आयआयटी पवईच्या मागच्या बाजूला मिठी नदीचं उगमस्थान आहे. या ठिकाणीच अनधिकृत झोपड्या वसल्या होत्या. त्यामुळे 'एस' विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांच्या नेतृत्वाखाली २७२ अनधिकृत झोपड्यांवर ४ दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आली. २००९ पासून या झोपड्यांवर कारवाईची टांगती तलवार होती. अखेर ८ वर्षांनी ही कारवाई करून मिठीचा परिसर झोपड्यामुक्त करण्यात आला.


  २७२ झोपड्या अनधिकृत 

  मिठी नदीवरील सर्वच अतिक्रमित बांधकामांविरोधात मागील २८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यानुसार जी ७६ कुटुंबं पात्र आहेत, त्या सर्वांना एव्हरशाईन नगर इथं पर्यायी घरे देऊन त्यांचं पुनर्वसन केलं जात आहे. तर उर्वरीत २७२ अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करून मिठीच्या मुखाला असलेलं अतिक्रमण साफ करण्यात आल्याचं ‘एस’ विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांनी सांगितलं.


  न्यायालयाची स्थगिती 

  मरोळ बामनदायापाडा, पवई फिल्टरपाडा येथील झोपड्यांवर कारवाई करण्यात आली असली तरी कुर्ला येथील किस्मत नगरमधील झोपड्यांवरील कारवाईला स्थगिती मिळाल्याने मिठी नदीवरील कारवाईचं शेपूट बाकी राहिलं आहे. मिठी नदीला विळखा घातलेल्या किस्मत नगरमध्ये एकूण ४६३ झोपड्यांची अतिक्रमणे असून यापैकी ३५९ बांधकामांना न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पण उर्वरीत सुमारे १०० बांधकामांवर कोणतीच स्थगिती नाही. याचसोबत स्थगिती दिलेली ४६३ बांधकामे कोणती याची माहिती समोर न आल्यामुळे तसेच या सर्वांची पडताळणी न झाल्यामुळे सध्या उर्वरीत १०० बांधकामांवरील कारवाईही थांबवण्यात आल्याची माहिती 'एल' विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी दिली आहे.

  या झोपड्यांमुळे एकप्रकारे मिठी नदी परिसरात बॉटलनेक तयार झाला आहे. त्यामुळेच मिठीला पूर आल्यावर येथील क्रांतीनगर, एलबीएस मार्ग आदी ठिकाणी पाणी साचून धोका निर्माण होतो, असंही आंबी यांचं म्हणणं आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.