Advertisement

कचरा विल्हेवाटीच्या जागेचा गैरवापर, १७ संकुलांना नोटीस


कचरा विल्हेवाटीच्या जागेचा गैरवापर, १७ संकुलांना नोटीस
SHARES

गृहनिर्माण संकुलात गांडुळ खत प्रकल्पासाठी राखीव असलेल्या जागेचा गैरवापर होत असल्यामुळे मुंबई महापालिकेने एम/पूर्व प्रभागामधील १७ संकुलांना एमआरटीपीतंर्गत नोटीस जारी केल्या आहेत. त्यामुळे एक महिन्यात या संकुलांनी जागा रिकामी करून खत प्रकल्प न राबवल्यास या संकुलांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.


काय आहे अट?

मुंबईत २ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवरील संकुल तसेच ज्या संकुलांमध्ये १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होतो, अशा सर्व संकुलांना ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे २००७ नंतर अनेक संकुलांना ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची अट 'आयओडी'त घालण्यात आली होती. त्यानुसार इमारत बांधकामांमध्ये ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी गांडुळ खत प्रकल्पासाठी जागा मोकळी ठेवून त्या जागेचा 'एफएसआय'चा लाभ घेण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात इमारतीला ओसी मिळाल्यानंतर अनेक संकुलांमध्ये गांडुळ खत प्रकल्प उभारण्याऐवजी त्या जागेचा वापर वाहने उभी करण्यास तथा उद्यान म्हणून विकसित करण्यात आल्याचे दिसून आले.


एफएसआयचे उल्लंघन

त्यामुळे एकप्रकारे एफएसआयचे उल्लंघनच करण्यात आल्याची बाब आली. २००७ नंतरच एकूण १८४६ सोसायटी असून गांडुळ खत न बनवल्याप्रकरणी १३३७ एनओसी घेतलेली आहे. मात्र, यातील ३८३ संकुलांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे त्यांना नोटीस पाठवलेली आहे. मात्र, यातील मानखुर्द, गोवंडी, देवनार येथील १७ संकुलांना एमआरटीपींतर्गत नोटीस जारी करण्यात आली आहे. आतापर्यंत एम पूर्व विभागातील १७ संकुलांनाच एमआरटीपीतंर्गत नोटीस दिलेली असून उर्वरीत विभाग कार्यालयांच्यावतीने इतर संकुलांना या एमआरटीपीतंर्गत नोटीस जारी करण्याचे निर्देश महापालिकेच्या सहायक आयुक्तांना दिल्याचे घनकचरा विभागाने स्पष्ट केले.

महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम (एमआरटीपी)१९६६ अंतर्गत नियम ५१(१) नुसार राखीव जागेचा वापर इतर कारणांसाठी केल्यास एक महिन्यांची नोटीस पाठवता येते. एमआरटीपी नियम ५३(७) नुसार १ महिना ते ३ वर्षांपर्यंतचा कारावास तसेच २ ते ५ हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा