Advertisement

क्वार्टर्स खाली न केल्यामुळे मनपाचे ४० कामगार निलंबित


क्वार्टर्स खाली न केल्यामुळे मनपाचे ४० कामगार निलंबित
SHARES

शीव येथील रावळी कॅम्पजवळील महापालिका वसाहत असलेल्या 'ए-वन’ अणि ‘ए- टू’ या इमारती धोकादायक ठरल्याने येथील कुटुंबांना इमारत खाली करण्याच्या नोटिसा महापालिकेने बजावल्या आहेत. परंतु, या नोटीसनंतर आपली घरे सोडण्यास नकार दिल्यामुळे महापालिकेच्या सफाई खात्यातील ४० कामगारांना निलंबित केल्याची धक्कादायक बाब विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्थायी समितीच्या बैठकीत निदर्शनास आणली.


धोकादायक इमारतीमुळे पाठवल्या नोटिसा

महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग हा आपल्या कामगारांना घर सोडण्याची नोटीस बजावून त्यांच्याशी दुजाभाव करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे केला. शीव येथील रावळी कॅम्प येथे ‘ए-वन’ अणि ‘ए- टू’ या घनकचरा व मलवाहिनी खात्यातील कामगार राहत असलेल्या दोन इमारती धोकादायक ठरल्या आहेत. त्यामुळे यासर्व कुटुंबांना माहुलमध्ये पाठवण्याची नोटीस बजावण्यात आली होती. परंतु, याबाबत आपण स्वत: आणि नगरसेवक मंगेश सातमकर यांनी हरकत घेऊन या सर्वांचे मालमत्ता विभागाकडे असलेल्या ४० रिक्त सदनिकांमध्ये पुनर्वसन व्हावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार मालमत्ता विभागानेही यासाठी तयारी दर्शवली होती.


'राखीव सदनिकांमध्ये पुनर्वसन करा'

परंतु, आता त्यापैकी केवळ १२ सदनिका ते द्यायला तयार असून एसएसपीअंतर्गत बांधलेल्या सदनिकांमधील ३५ सदनिका त्यांनी द्यायची तयारी दर्शवली आहे. परंतु, त्या ३ ते ४ वर्षांपासून बंद असून त्या दुरुस्तीच्याही पलिकडे गेल्या आहेत. या सर्वांना खोल्या रिकाम्या करून देण्यास सांगितले जात आहे. परंतु, ते घर सोडत नाहीत म्हणून एफ दक्षिण आणि एफ उत्तरमधील ४० कामगारांना निलंबित करण्यात आले आहे. या सर्वांना कामावर रुजू करून घेतले जात नसल्याचे राजा यांनी सांगितले. त्यामुळे यासर्वांचे निलंबन त्वरीत रद्द केले जावे आणि या कुटुंबांचे जवळच्या मालमत्ता विभागाकडे राखीव असलेल्या सदनिकांमध्ये पुनर्वसन करावे, अशी मागणी राजा यांनी केली.


'विक्रोळीमध्ये पुनर्वसन का?'

या हरकतीच्या मुद्दयाला पाठिंबा देत राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी घाटकोपरमधील चिराग नगरमधील महापालिका इमारतही अशाच प्रकारे धोकादायक झाली आहे. परंतु, या सर्वांना विक्रोळी पार्कसाईटला पाठवले जात आहे. मग अशा परिस्थितीत या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची मोठी गैरसोय होऊ शकते. डॉकयार्ड रोड इमारत दुघर्टनेनंतर तेथील कामगारांच्या कुटुंबांना घाटकोपरमध्ये पाठवले आणि येथील कुटुंबांना विक्रोळीला पाठवले जात आहे. त्यामुळे याबाबतही प्रशासनाने खुलासा करावा, अशी सूचना जाधव यांनी केली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा