Advertisement

कुर्ला-सांताक्रूझमधील जलवाहिनी लगतच्या झोपड्यांवर मुदतीपूर्वीच कारवाई!


कुर्ला-सांताक्रूझमधील जलवाहिनी लगतच्या झोपड्यांवर मुदतीपूर्वीच कारवाई!
SHARES

तानसा जलवाहिनीलगतच्या झोपड्यांवरील कारवाईला स्थगिती मिळवण्याबाबत केलेली याचिक फेटाळण्यात आली. त्यानंतर मुंबई महापालिकेने न्यायालयाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रातील मुदतीनुसार ही कारवाई पुढे सलग ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. न्यायालयाला दिलेल्या मुदतपूर्व कालावधीतच या झोपडया तोडून पात्र कुटुंबांचे पुनर्वसन माहुललाच करण्यात येईल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.


न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई सुरू

साकीनाका, पवई येथील जलवाहिनी लगतच्या झोपड्यांवर महापालिकेच्या माध्यमातून सुरु असलेल्या कारवाईला स्थगिती मिळवण्यासाठी आमदार नसिम खान यांनी केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली. मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसारच ही कारवाई सुरु असून त्यांनी दिलेल्या मुदतीत ही कारवाई पूर्ण केली जाईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


तानसा जलवाहिनीलगतच्या या झोपड्यांवर कारवाई

महापालिकेच्या एल विभाग अर्थात कुर्ला, साकीनाका परिसरात उदयनगर, आंबेडकरनगर तसेच मोहिली असल्फा व्हीलेज आदी परिसरातील तानसा जलवाहिनीलगतच्या झोपड्यांवर कारवाई करण्यात येत आहे. यासर्व भागांमध्ये तब्बल ५ हजार ५४० झोपड्या असून आतापर्यंत सुमारे १ हजार १०० झोपड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यापैकी सुमारे ५०० पात्र कुटुंबांचे पुनर्वसन माहुलला करण्यात येत आहे, असे एल विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी स्पष्ट केले.

३१ डिसेंबरपूर्वी ही कारवाई पूर्ण केली जाणार आहे. यामध्ये शनिवारी तसेच पुढे २८,२९ आणि ३० तारखेपर्यंत या टप्प्यातील कारवाई पूर्ण करून पुढे ती कायम ठेवली जाईल, असे त्यांनी सांगितले.


या भागातही कारवाई सुरू

मुंबईतील कुर्ला पाठोपाठ वांद्रे, खार, सांताक्रूझ पूर्व भागांमध्येही जलवाहिनी लगतच्या झोपड्यांवर कारवाई सुरु आहे. येथील वांद्रे गरीबनगर, इंदिरानगर, गावदेवी, वाकोला पाईपलाईन परिसरात तब्बल दोन हजार झोपड्या बाधित आहेत. त्यातील आतापर्यंत १ हजार ३३० झोपड्यांवर कारवाई करण्यात आली असून ६४० झोपड्यांवरील कारवाई शिल्लक असल्याचे एच-पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांनी स्पष्ट केले. यामध्ये जे ५८५ पात्र कुटुंबे आहेत, त्या सर्वांचे पुनर्वसन माहुलला करण्यात येत आहे. मात्र, ही कारवाई सोमवारपासून अधिक कडक आणि जलदगतीने करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा