Advertisement

पश्चिम उपनगरातील झाडांच्या कचऱ्याचा प्रश्न मिटला


पश्चिम उपनगरातील झाडांच्या कचऱ्याचा प्रश्न मिटला
SHARES

पावसाळ्यात होणारी झाडांची पडझड आणि त्यामुळे निर्माण होणारा कचरा याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने मुंबईत ग्रीन वेस्ट प्रकल्प राबवला आहे. गोदरेज कंपनीची मदत घेत महापालिकेने झाडांच्या फांद्या आणि त्यांच्या बुद्यांवर प्रक्रिया करून प्रतिदिन ५० टन क्षमतेचा ग्रीन वेस्ट प्रकल्प राबवला. आता यापासून कोळशाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतील झाडांचा पालापाचोळा आणि खोडांचा जो ग्रीन कचरा डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो, त्याचं प्रमाण कमी होणार आहे.



ग्रीन वेस्ट प्रकल्पाची निर्मिती कशी?

मुंबईत पावसाळ्यापूर्वी अनेक झाडांची छाटणी केली जाते. पावसाळ्यात अनेकदा वादळ-वाऱ्यामुळे झाडांचीही पडझड होते. त्यामुळे झाडांचा पालापाचोळा आणि त्यांच्या खोडांचा कचरा निर्माण होऊन त्यापासून दुर्गंधी आणि अस्वच्छता निर्माण होते. त्यामुळे या ग्रीन वेस्ट प्रकल्पासाठी आता के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी पुढाकार घेतला. गोदरेज कंपनीच्या मदतीने सीएसआर फंडातून या ग्रीन वेस्ट प्रकल्पाची निर्मिती केली.


येथे साकारला ग्रीन प्रकल्प

अंधेरी पश्चिम येथील बांदिवली गावातील सेवा सुविधांसाठी राखीव असलेल्या १५८० चौरस मीटरच्या जागेवर हा ग्रीन प्रकल्प साकारला आहे. या प्रकल्पात झाडांचा पालापाचोळा आणि तुटलेल्या फांद्या यांच्यावर प्रक्रिया करून त्याचे रुपांतर जळावू कोळशात केलं जाणार आहे. सीएसआर निधीतून करण्यात आलेल्या या प्रकल्पाचं काम पूर्ण झालं आहे. तर शुक्रवारी गोदरेज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नादीर गोदरेज, गोदरेज प्रॉडक्ट्सचे उपाध्यक्ष अनुभव गुप्ता, उपायुक्त किरण आचरेकर यांच्याहस्ते उद्घाटन पार पडले.


कचऱ्यावर प्रक्रिया करून कोळशाची निर्मिती

या ग्रीन प्रकल्पांमध्ये पश्चिम उपनगरातील ९ विभागातल्या झाडांचा पालापाचोळा आणि खोडांच्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. पश्चिम उपनगरातील हा मोठा ग्रीन वेस्ट प्रकल्प असून याठिकाणी दरदिवशी ५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यांचं रुपांतर जळावू कोळशांमध्ये केलं जाणार असल्याची माहिती के-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली. यामुळे पश्चिम उपनगरातील सर्व वॉर्डातील झाडांच्या फांद्यांचा कचरा आता डम्पिंग ग्राऊंडवर टाकावा लागणार नाही, असे त्यांनी सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा