Advertisement

मुंबईत येणार भूमिगत कचरापेट्या, महापालिकेचा प्रयोग यशस्वी

उघड्यावरील कचरापेट्यांतील कचऱ्यामुळे पसरणारी दुर्गंधी, रोगराई रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने भूमिगत कचरापेट्यांची संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत येणार भूमिगत कचरापेट्या, महापालिकेचा प्रयोग यशस्वी
SHARES

उघड्यावरील कचरापेट्यांतील कचऱ्यामुळे पसरणारी दुर्गंधी, रोगराई रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने भूमिगत कचरापेट्यांची संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने याआधी ४ ठिकाणी प्रायोगिक तत्वावर भूमिगत कचरापेट्या बसवल्या होत्या. हा प्रयोग यशस्वी झाल्याने महापालिकेने शहरातील २० ठिकाणी भूमिगत कचरापेट्या बसवण्याचं ठरवलं आहे.  


उघड्या कचऱ्याचा त्रास 

सद्यस्थितीत मुंबईतील रस्ते, चौकांत उघड्यावर कचऱ्यापेट्या ठेवण्यात येतात. महापालिकेची कचरा गोळा करणारी गाडी दिवसातील ठराविक वेळेला कचरापेटीतील कचरा गोळा करून डम्पिंग ग्राऊंडवर घेऊन जाते. परंतु दिवसभरात खासकरून रात्रीच्या वेळेत परिसरातील भटकी कुत्री किंवा कचरावेचक कचरापेटीतील कचरा अस्ताव्यस्त करून टाकतात. 

यामुळे कचरापेटी परिसरात घाण आणि दुर्गंधींचं साम्राज्य पसरतं. शिवाय संबंधित परिसरातील रहिवासी कचरा पेटीत न टाकता, पेटीच्या अवतीभोवती टाकून निघून जातात, त्यामुळे कचरापेटी असलेल्या परिसरातून जाताना इतरांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. हा त्रास टाळण्यासाठी महापालिकेने भूमिगत कचरापेटी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला.  

प्रयोग यशस्वी

प्रायोगिक तत्वावर मुंबई महापालिकेने दक्षिण मुंबईत मरिन लाइन्स आणि उपनगरात मालाड तसंच कांदिवलीत कचरापेट्या बसवल्या होत्या. हा प्रयोग यशस्वी झाल्याने महापालिकेने आता २ घनमीटरच्या ४० कचरापेट्या विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत २० ठिकाणी या कचरापेट्या बसविण्याचा महापालिकेचा विचार आहे. महापालिका एका कचरापेटीसाठी १० लाख रुपये मोजणार आहे. त्यानुसार महापालिका ४० भूमिगत कचरापेट्यांसाठी ४ कोटी रुपये खर्च करणार आहे.  


‘इतका’ येणार खर्च

भूमिगत कचरापेट्या बसवण्यासाठी महापालिकेने निविदा मागवल्या होत्या. या निविदांना ४ कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला होता. त्यापैकी २  कंत्राटदार अपात्र ठरले, तर उरलेल्या २ कंत्राटदारांपैकी एकाचे दर जास्त होते. त्यामुळे सर्वांत कमी म्हणजे ४ कोटी रुपयांत काम करण्यास तयार असलेल्या मे. मॅक एन्व्हायरोटेक अॅण्ड सोल्युशन या कंत्राटदाराला भूमिगत कचरापेटी बसवण्याचं काम देण्यात आलं आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीतही मंजुरी देण्यात आली आहे. कंत्राटदार महापालिकेला १० लाख ३८ हजार ९६० रुपयांना एक याप्रमाणे ४० भूमिगत कचरापेट्या पुरवणार आहे.  

भूमिगत केबलचा अडथळा

भूमिगत कचरापेटी बसवताना तिथून भूमिगत केबल गेलेली असल्यास कचरापेटी बसवण्यास अडथळा येतो. हे लक्षात घेऊन भूमिगत केबल नसलेल्या जागांची निवड करून अशा जागांवर पुढच्या ३ महिन्यांत शहरातील २० ठिकाणी या भूमिगत कचरापेट्या बसवण्यात येणार आहेत.

भूमिगत कचरापेट्यांमुळे संबंधित परिसरात कचरा व दुर्गंधी पसरणार नाही. यामुळे पादचाऱ्यांना कचरापेटीच्या बाजूने चालणंही अडचणीचं ठरणार नाही, असा दावा महापालिकेने केला आहे.



हेही वाचा-

सांडपाणी प्रक्रियेसाठी महापालिकेतर्फे ७ प्रक्रिया केंद्राची उभारणी

‘इथं’ नोंदवा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या तक्रारी, महापालिकेने आणलं ‘हे’ अॅप



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा