नालेसफाईच्या कामांवर यंदा शंभर कोटींचा खर्च

  CST
  नालेसफाईच्या कामांवर यंदा शंभर कोटींचा खर्च
  मुंबई  -  

  मुंबई महापालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या नालेसफाईच्या कामांवरून वाद निर्माण झालेला असून यंदा कोणत्याही प्रकारची नालेसफाईची कामे करण्यात येऊ नयेत, अशी मागणी होत आहे. परंतु यंदा नालेसफाईच्या कामांसाठी मोठे नाले, छोटे नाले तसेच रस्त्यालगतचे छोटे नाले यासाठी तब्बल 103 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे नालेसफाईच्या कामांकरता कार्यादेशही देण्यात आले आहेत. मात्र आयुक्तांच्या आदेशानुसार प्रत्यक्ष नालेसफाईच्या कामाला 15 दिवस उलटत आले तरी सुरुवातच झालेली नाही. त्यामुळे पुन्हा होणारा शंभर कोटींचा खर्च केला जातो, की स्थायी समिती याला चाप लावते, याकडेच सर्वांचे लक्ष आहे.

  मिठी नदीतील सफाईच्या कामाच्या प्रस्तावाबाबत स्थायी समितीत दोन गट तयार झाल्यानंतर हा प्रस्ताव तहकूब करण्यात आला आहे. परंतु नालेसफाईचा हा प्रस्ताव तहकूब करण्यात आला असला तरी पश्चिम उपनगरातील मोठ्या नाल्यांचा आणि शहरातील एफ/उत्तर विभागातील नालेसफाईचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी आणला गेला आहे.

  नालेसफाईच्या कामांबाबत शंका उपस्थित करत आधी गाळ टाकण्यात येत असलेल्या जागा दाखवा, नंतरच सफाई करण्यात यावी, असा पवित्रा महापालिकेतील सत्ताधारी पक्षाने घेतला आहे. मात्र, या आठवड्यात नालेसफाईचा गाळ कुठे टाकला जाणार, त्या ठिकाणांची पाहणीच करण्यात न आल्यामुळे नालेसफाईच्या कंत्राटाबाबत आता सत्ताधारी पक्ष काय भूमिका घेतोय, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा छोटे, मोठे नाले तसेच रस्त्यालगतचे नाले आणि पेटीका नाल्यांच्या सफाईसाठी 103 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. मोठ्या नाल्यांच्या कामांसाठी कंत्राटे मंजूर करून कार्यादेशही देण्यात आले आहेत, तर छोटे नाले आणि पेटीका नाल्यांच्या सफाईसाठी खासगी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कामे करण्यासाठीही कार्यादेश दिलेले आहेत. त्यामुळे तब्बल 80 टक्के कंत्राट कामांचे कार्यादेश देण्यात आले असल्याची माहिती पर्जन्यजल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून समजते.

  महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी एक एप्रिलपासून नालेसफाईच्या कामाला सुरुवात होईल, असा दावा केला होता. परंतु 18 एप्रिल उजाडला तरीही प्रत्यक्ष नालेसफाईच्या कामाला सुरुवात झालेली नाही. महापालिका विरोधी पक्ष नेते रवी राजा यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही नालेसफाईचे काम 1 एप्रिलला सुरू होणार असा दावा महापलिका आयुक्तांंनी कशाच्या आधारे केला? जर दावा केला होता, तर मग अद्यापही सफाईचे काम का सुरू झाले नाही? त्यामुळे प्रशासनच नालेसफाईच्या कामांबाबत गंभीर नसल्याचे स्पष्ट होत आहे, असा आरोप केला.

  रेल्वेला दिले नालेसफाईसाठी 4.15 कोटी रुपये

  मुंबईतील रेल्वेच्या हद्दीतील नाल्यांची सफाई महापालिकेतर्फे रेल्वेकडून केली जाते. त्यामुळे रेल्वे हद्दीतील नाल्यांची सफाई करण्यासाठी यंदा महापालिकेच्यावतीने 4 कोटी 15 लाख 82 हजार 607 रुपयांचा निधी मध्य आणि पश्चिम रेल्वेला देण्यात आला आहे. मागील वर्षी रेल्वे प्रशासनाला नालेसफाईसाठी सव्वा तीन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता.

  नालेसफाईवर करण्यात येणार खर्च

  मोठ्या नाल्यांची सफाई - 51 कोटी 39 लाख 91 हजार 376

  मिठी नदीची सफाई  - 18 कोटी 3 लाख 83 हजार 574

  छोट्या नाल्यांची सफाई -  20 कोटी 40 लाख 24 हजार 700

  रस्त्यालगतचे नाले,पेटीका नाले - 13 कोटी 28 लाख 50 हजार 300

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.