Advertisement

मुंबईतील त्या १०४ इमारतींवर मेपूर्वी होणार कारवाई


मुंबईतील त्या १०४ इमारतींवर मेपूर्वी होणार कारवाई
SHARES

मुंबईत आजही १०४ अतिधोकादायक इमारती आहेत. मागील वर्षी या इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित केल्यानंतर अजूनही त्या रिकाम्या करण्यात महापालिकेला यश आलेलं नाही. त्यामुळे यासर्व इमारतीत यावर्षीच्या मे महिन्यापूर्वी तातडीने रिकाम्या करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सर्व परिमंडळांच्या उपायुक्तांना दिले आहेत.


मागील वर्षी मुंबईतील ६६४ अतिधोकादाय इमारतींपैकी ९९ इमारतींची प्रक्रिया पूर्ण करून तोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे एकूण ५६५ एवढ्या धोकादायक इमारती शिल्लक होत्या. त्यापैकी १०१ इमारती यापूर्वीच रिकाम्या करण्यात आल्या असून उर्वरित ४६४ इमारतींबाबतची कार्यवाही सुरू आहे. या ४६४ इमारतींपैकी १८० इमारतींना न्यायालयाच्या निर्देशांनुसार स्थगिती मिळालेली आहे, तर ३६ इमारतींबाबत तांत्रिक सल्लागार समितीच्या स्तरावर कार्यवाही सुरू आहे. याशिवाय उर्वरित २४८ इमारतींपैकी १४४ इमारतींचा यापूर्वीच वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्यात आली होती. त्यामुळे केवळ १०४ इमारतींबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नव्हती. त्यामुळे बुधवारी झालेल्या सर्व उपायुक्तांच्या बैठकीत महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी यासर्व १०४ इमारतींवर मे २०१८ पूर्वी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.


कार्यवाहीसाठी इमारतींची स्वतंत्र फाईल

या १०४ इमारती रिकाम्या करण्याच्या दृष्टीने प्रबोधन कार्यक्रम राबवला जावा. तसेच पोस्टर, माहितीपट यांचा प्रभावी उपयोगही करावा. याशिवाय राबवत असलेल्या प्रक्रियेची योग्यप्रकारे नोंद होण्याच्या दृष्टीने प्रत्येक इमारतीची स्वतंत्र नस्ती अर्थात फाईल तयार करावी, अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.


वीज, पाणी तोडलेल्या इमारतींची पुन्हा होणार तपासणी

महापालिकेने यापूर्वी अतिधोकादायक म्हणून १४४ इमारतींची वीज आणि जल जोडणी खंडित केली आहे. या सर्व इमारतींची पुन्हा तपासणी करावी आणि या तपासणीदरम्यान ज्या इमारतींमध्ये अनधिकृतपणे वीज वा जलजोडणी घेतल्याचे आढळून आल्यस अशा इमारतींना न्यायालयाच्या अवमान केल्याप्रकरणी तात्काळ खटला दाखल करावा, असेही आदेश दिले आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा