Advertisement

जगातील ७ आश्चर्य अवतरणार माझगावच्या बाप्टीस्टा उद्यानात

महापालिकेच्या जोसेफ बाप्टीस्टा उद्यान उभारण्यात येणाऱ्या ७ आश्चर्यांच्या प्रतिकृतींच्या जवळ संबंधित मूळ ठिकाणाची माहिती व वैशिष्ट्य सांगणारे फलक बसविण्यात येणार आहेत.

जगातील ७ आश्चर्य अवतरणार माझगावच्या बाप्टीस्टा उद्यानात
SHARES

माझगाव येथील जोसेफ बाप्टीस्टा उद्यानांत आता जगातील ७ आश्चर्य अवतरणार आहे. जगातील ७ आश्चर्यांच्या प्रतिकृती उभारून या उद्यानाचं नूतनीकरण करण्यात येणार त्यासंदर्भातील माहितीही पर्यटकांना या उद्यानात मिळणार आहे.


बाप्टीस्टा उद्यानाचं वैशिष्ट्य

बृहन्मुंबई महापालिकेच्या 'इ' विभाग कार्यक्षेत्रातील माझगांव परिसरात डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ महापालिकेचं जोसेफ बाप्टीस्टा उद्यान आहे. समुद्रसपाटीपासून साधारणपणे १०० फुटांपेक्षा अधिक उंच असणाऱ्या टेकडीच्या माथ्यावर असणारं हे उद्यान सुमारे ५ लाख ४४ हजार चौरस फुटांच्या विस्तीर्ण परिसरात पसरलेलं आहे. मुंबईतील सर्वात जुन्या उद्यानांपैकी एक असणाऱ्या या उद्यानात वेगवेगळ्या प्रजातींची वनसंपदा आहे. या उद्यानातून दक्षिण मुंबईचं विहंगम दृश्य तर दिसतंच पण इथे असणारा छोटा कृत्रिम धबधबा देखील पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय आहे.


कुठली सुविधा उभारणार?

शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका यामिनी जाधव आणि सभागृहनेते यशवंत जाधव यांच्या संकल्पनेतून जगातील ७ आश्चर्यांच्या प्रतिकृती उभारून या उद्यानाचा विकास केला जात आहे. महापालिकेच्या जोसेफ बाप्टीस्टा उद्यान उभारण्यात येणाऱ्या ७ आश्चर्यांच्या प्रतिकृतींच्या जवळ संबंधित मूळ ठिकाणाची माहिती व वैशिष्ट्य सांगणारे फलक बसविण्यात येणार आहेत.

तसेच प्रतिकृतींच्या सभोवताली रंग बदलणारे एल.ई.डी.प्रकारातील दिवे देखील बसविण्यात येणार आहेत. या दिव्यांमुळे सांयकाळच्या वा रात्रीच्या वेळी या प्रतिकृतींचं सौंदर्य अधिक खुलून दिसणार आहे. उद्यानातील ज्या ठिकाणी या प्रतिकृती बसविण्यात येणार आहेत. त्या भागातील उद्यानविषयक बाबींचंही अनुरुपीकरण केलं जाणार असल्याची माहिती उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.



किती खर्च येणार?

या सर्व कामांसाठी साधारणपणे २ कोटी ६ लाख रुपयांचा खर्च अंदाजित आहे. कार्यादेश दिल्यानंतर साधारणपणे ६ महिन्यांत हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे. कार्यादेश देण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती प्रक्रिया सध्या सुरु आहे. त्यानुसार हे काम साधारणपणे मे २०१८ पर्यंत होणं अपेक्षित असल्याचं मत परदेशी यांनी व्यक्त केलं.


जबाबदारी कुणाकडे?

आजवर या उद्यानाचा विकास हा जलअभियंता विभागामार्फतच करण्यात आलेला आहे. पण प्रथमच या उद्यानाचा विकास उद्यान विभागामार्फत करण्यात येत आहे. ७ आश्चर्यांच्या प्रतिकृती बसवून उद्यानाचा विकास करण्यात येत असल्याने जलअभियंता विभागाने उद्यान विभागाला एनओसी दिली आहे. त्यानुसार हे काम उद्यान विभाग करत आहे. मात्र, उद्यानाचा विकास झाल्यानंतर त्याची देखभाल जलअभियंता विभागामार्फतच करण्यात येईल, असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.


उद्यानात 'या' ७ आश्चर्यांच्या प्रतिकृती असणार

  • ब्राझिलच्या रिओ शहरातील येशू ख्रिस्तांचा पुतळा
  • इटलीतील पिसा शहरातील कलता मनोरा
  • अमरिकेतील न्यूयॉर्क शहरातील स्वातंत्र्य देवतेचा पुतळा
  • इटलीच्या रोम शहरातील कलोसियम हे खुलं सभागृह
  • फ्रान्समधील पॅरीस शहरातील आयफेल टॉवर
  • मेक्सिको देशातल्या टिनम शहरातील चिनचेन इत्झा पिरॅमिड
  • आग्रा शहरातील ताजमहल
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा