भटक्या प्राण्यांकरिता मुंबईत दहनभट्टी

मुंबईसह उपनगरात भटक्या श्वान, मांजर यांची संख्या वाढली आहे.

भटक्या प्राण्यांकरिता मुंबईत दहनभट्टी
SHARES

मुंबईसह उपनगरात भटक्या श्वान, मांजर यांची संख्या प्रचंड वाढली आहे. मुंबईच्या अनेक भागांत व गल्लोगल्ली असे प्राणी पाहायला मिळतात. परंतु, त्यांना निवारा व व्यवस्थित खाणं मिळत नसल्यानं मिळेल ते खातात. अशा खाण्यामुळं त्यांच्या तब्येतीवर परिणाम होऊ विविध आजारांना बळी पडतात. परिणामी त्यांचा मृत्यू होते. मात्र, त्यांचा कोणी वाली नसल्यानं हे मोकाट प्राणी मृत्यूनंतर रस्त्यावरच पडलेले पाहायला मिळतात. त्यामुळं त्या परिसरात दुर्घंधी पसरते. त्यामुळं या मोकाट प्राणी मृत झाल्यानंतर त्यांची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी मृत प्राणी उघड्यावर, गटारात, नदी-नाल्यांत थेट टाकले जातात. परंतु, ही गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेमार्फत प्राण्यांकरिता दहनभट्टी सुरू करण्यात येणार आहे.

प्राण्यांकरिता दहनभट्टी

मुंबई महापालिकामार्फत महालक्ष्मी, मालाड आणि देवनारमध्ये प्राण्यांकरिता दहनभट्टी सुरू करण्यात येणार आहे. ही दहनभट्टी ‘पीएनजी’वर आधारित असून भटके श्वान, मांजरांवर इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महापालिका नवीन दहनभट्टी उभारण्यासाठी १७ कोटी ८० लाख २९ हजार रुपये खर्च करणार आहे. महालक्ष्मी, मालाड आणि देवनारपैकी महालक्ष्मी श्वान नियंत्रण कक्ष कार्यालयाच्या जागेमध्ये टाटा ट्रस्टमार्फत प्राण्यांचं रुग्णालय बांधण्यात येणार आहे. या ट्रस्टमार्फत इथं प्राण्यांसाठी दहनभट्टीही उभारली जाणार आहे.

स्थायी समितीची मंजुरी

महापालिकेच्या मालाड येथील गुरांचा कोंडवाडा इथं ताशी ५० किलो व देवनार इथं ताशी ५०० किलो एवढ्या क्षमतेच्या दहनभट्ट्या बसविण्यात येणार आहेत. या दहनभट्ट्यांचं पुढील ५ वर्षांपर्यंत देखभाल व दुरुस्तीचं कंत्राट दिलं जाणार आहे. त्यासाठी मे. अनिथा टेक्सकॉट (इंडिया) कंपनीची निवड करण्यात आली आहे. या दहनभट्ट्या पर्यावरणपूरक असणार आहेत. या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाली आहे..

हिरवा कंदील

महापालिकेच्या महासभेनं हिरवा कंदील दाखविल्यानंतर दहनभट्ट्या उभारण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. या दहनभट्टीचं परिचलन महापालिकेमार्फत करण्यात येणार आहे. दरम्यान, उच्च न्यायालयानं प्राण्यांच्या मृत शरीराचं दहन करण्याचे आदेश दिले आहेत. प्राणी क्लेश प्रतिबंध कायदा १९६० आणि प्राणी जनन नियंत्रण नियमावली २००१ अन्वये प्राण्यांसाठी दहनभट्टीची व्यवस्था स्थानिक प्रशासनानं करणं बंधनकारक करण्यात आले आहे.

मृतदेहाची विल्हेवाट

सध्या महापालिका क्षेत्रात परळ परिसरात पाळीव प्राण्यांसाठी एक खाजगी अंत्यसंस्कार केंद्र आहे. ते एका स्वयंसेवी संस्थेद्वारे चालविण्यात येत आहे. महापालिका क्षेत्रातील भटक्या जनावरांच्या मृतदेहाची विल्हेवाट बोरीवली परिसरातल्या ‘कोरा केंद्र’ या स्वयंसेवी संस्थेद्वारे लावण्यात येत आहे.

संबंधित विषय