Advertisement

महापालिकेच्या 18 प्रसुतीगृहांमध्ये अजूनही सीसीटीव्ही नाहीत


महापालिकेच्या 18 प्रसुतीगृहांमध्ये अजूनही सीसीटीव्ही नाहीत
SHARES

मुंबई महापालिका दवाखाने आणि प्रसुतीगृहांमध्ये अर्भकांच्या चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता मुंबई हायकोर्टानं पालिकेला प्रसुतीगृह आणि दवाखान्यात सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश दिले होते. मात्र कोर्टानं दिलेल्या आदेशांकडे पालिकेनं दुर्लक्ष केल्याचं स्पष्ट झालंय. महापालिकेच्या तब्बल 18 प्रसुतीगृहांमध्ये सीसीटीव्ही नसल्याचं समोर आलं आहे. शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी याबाबत पालिका आयुक्तांना प्रश्न केला असता त्यांनी दिलेल्या अहवालातून ही बाब स्पष्ट झालीय.

महापालिका आयुक्तांकडून 66 अ प्रश्नामार्फत पालिका दवाखाने आणि प्रसुतीगृहामंध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही संदर्भात माहिती मागवली होती. त्यातून मिळालेली माहिती खरंच धक्कादायक असल्याचं शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी सांगितलं.


मी या आधी बऱ्याचदा या प्रश्नावर आवाज उठवला होता. त्यामुळे मी 66 अ या प्रश्नामार्फत पालिका आयुक्तांना प्रश्न विचारला. प्रसुतीगृहातून बरेचदा सीसीटीव्ही नसल्याकारणाने अर्भक चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मुंबई हायकोर्टानं पालिकेला प्रत्येक प्रसुतीगृहात सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश दिले. पण, अजूनही बऱ्याच प्रसुतीगृहात सीसीटीव्ही बसवले असतील तर ते बंद असल्याचं स्पष्ट झालं. तसंच या सीसीटीव्हीचं मेंटेनेन्स कोण करतं? असा प्रश्न विचारला असता या प्रश्नावर मला प्रशासनाची उदासिनता दिसून आली.

शीतल म्हात्रे, नगरसेविका, शिवसेना

अर्भक चोरीच्या वारंवार होणाऱ्या घटना महापालिका आयुक्त आणि प्रशासन गंभीरतेनं घेत नसल्याचा आरोपही शीतल म्हात्रे यांनी यावेळी केला आहे. एकूण महापालिकेकडून दिलेल्या यादीत मुंबईतील आणि परिघावरच्या 52 प्रमुख दवाखान्यांची माहिती आहे. पण, मुंबईतल्या प्रमुख 18 दवाखान्यांमध्ये एकही सीसीटीव्ही बसवलेला नसल्याचंही महापालिका आयुक्तांनी मान्य केल्याचं शीतल म्हात्रे यांनी सांगितलं. तसंच सीसीटीव्हीच्या देखभालीचाही प्रश्न विचारला असता देखभालीचं कंत्राट 2009 मध्येच संपूनही प्रशासन त्यांच्या देखभालीची सोय का करत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पालिका बाळ आणि मातेचा जीव धोक्यात घालत असल्याचा आरोपही शीतल म्हात्रे यांनी केला आहे. 2009 मध्ये सायनच्या दवाखान्यातून अर्भकाच्या चोरीची घटना समोर आल्यानंतर मुंबई हायकोर्टानं महापालिकेला सीसीटीव्ही लावण्याचे आदेश दिले. कोर्टाच्या आदेशानंतर पालिकेनं 27 लहान आणि मोठ्या दवाखान्यांमध्ये, तसंच 26 प्रसुतीगृहांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 27 दवाखाने आणि 8 प्रसुतीगृहांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले. पण, अजूनही 18 प्रसुतीगृहात सीसीटीव्ही बसवण्यात आले नाहीत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा