Advertisement

शिवडी घासलेट बंदरावर बीपीटीच टाकतेय बेकायदा डेब्रिज


शिवडी घासलेट बंदरावर बीपीटीच टाकतेय बेकायदा डेब्रिज
SHARES

शिवडी पूर्वेकडील घासलेट बंदर परिसरातील समुद्र किनाऱ्यावर मुंबई पोर्ट ट्रस्टकडून डेब्रिजचा भराव टाकण्याचे काम बेधडकपणे सुरू आहे. त्यामुळे येथे 'समुद्रशेती' करणाऱ्या कोळी बांधवांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांच्यामध्ये असंतोष पसरला आहे. एका बाजूला झाडे लावा, झाडे जगवा, असा संदेश देणारे प्रशासन पर्यावरणाच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा घटक असलेली 'खारफुटी' वाचविण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. त्यामुळे येथील कोळी बांधवांनी मुंबई पोर्ट ट्रस्टचे वरिष्ठ सहाय्यक ट्रॅफिक मॅनेजर प्रफुल्ल कांबळे यांची भेट घेऊन खारफुटी वाचविण्यासाठी प्रशासनाने तात्काळ ठोस पाऊले उचलावीत, अशी लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे.

शिवडी पूर्वेकडील घासलेट बंदर समुद्र किनारा पर्यावरण प्रेमींना परिचयाचा आहे. निसर्गाच्या सानिध्याने नटलेल्या या परिसरात मागील 10 वर्षांपासून 'फ्लेमिंगो फेस्टिव्हल'चे आयोजन विविध संस्थांच्या वतीने करण्यात येते. त्याचबरोबर शिवडी, वडाळा परिसरातील विद्यालये, महाविद्यालयातील विदयार्थ्यांना पर्यावरणाबाबतची माहिती देण्यासाठी येथे आणले जाते.

शंभर वर्षांपासून समुद्र शेती सुरू -
त्याचसोबत बंदर परिसरातील शेकडो कोळी बांधव मागील शंभर वर्षांपासून येथे 'समुद्रशेती' करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. खरंतर शिवडीचा समुद्र किनारा निर्मनुष्य असल्याने येथे कोळी बांधवांव्यतिरिक्त सहसा कुणी फिरकत नाही. असे असूनही या समुद्र किनाऱ्यावर चिखल, दगड, डेब्रिजचा भराव टाकून बंदर नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

भरावाने पर्यावरणावर दुष्परिणाम -
समुद्र किनाऱ्यावर भराव टाकल्याने खारफुटीची झाडे सुकू लागली आहेत. परिणामी माशांचे किनाऱ्यालगत येण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. येथे येणाऱ्या पक्षांची संख्या देखील दिवसेंदिवस घटत आहे. पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम पाहता येथे टाकण्यात येणाऱ्या भरावावर वेळेत नियंत्रण आणणे गरजेचे असल्याचे स्थानिक कोळी बांधवांचे म्हणणे आहे.

मॅन्ग्रूव्ह्ज उद्यानाचा फलक अजूनही तसाच -

15 जानेवारी 1996 साली मुंबई पोर्ट ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष दिनेश के. अफझुलपूरकर यांनी शिवडी घासलेट बंदराची पाहणी करून या बंदराला शिवडी मॅन्ग्रूव्ह्ज उद्यानात परावर्तीत करण्याची घोषणा केली होती. तसा फलक या विभागात आजही आहे. असे असताना बीपीटी प्रशासनाचे अधिकारी या खारफुटीलगत कचरा व मातीचे डंपर ओतत आहेत. ते पाहून पर्यावरणाबाबत विद्यमान सरकार किती उदासीन आहे हे स्पष्ट होते.

प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे कोळी बांधवांत कमालीचा संताप उसळला असून वेळीच भराव न हटविल्यास पावसाळ्यात उठणाऱ्या समुद्राच्या लाटांनी पर्यावरण रक्षक खारफुटी भरावाखाली जाऊन नष्ट होण्याची भीती लीलाधर महादेव पाटील यांनी व्यक्त केली.

येथे टाकण्यात आलेला भराव तत्काळ हटविण्यासाठी बीपीटी अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले असता हा भराव बीपीटी प्रशासनाकडूनच टाकण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. परिणामी वडिलोपार्जित व्यवसाय धोक्यात येऊन कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ येणार आहे, असे स्थानिक रहिवासी विलास जोशी यांनी सांगितले.

मात्र ही जागा कोळी बांधवांची नसून बीपीटी प्रशासनाची आहे. त्यामुळे बीपीटी प्रशासनाच्या आदेशानुसार येथे भराव टाकण्याचे काम सुरु आहे, असे मुंबई पोर्ट ट्रस्टचे वरिष्ठ सहाय्यक ट्रॅफिक मॅनेजर प्रफुल्ल कांबळे यांनी सांगितले. ही भरणी सपाट जागेत लवकरात लवकर पसरविण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा