म्युझिक थेरेपी करेल कर्करोगावर मात - ब्रेट ली

 Mumbai
म्युझिक थेरेपी करेल कर्करोगावर मात - ब्रेट ली
Mumbai  -  

कर्करोगग्रस्त मुलांची काळजी घेणारी संस्था 'सेंट ज्यूड्स चाईल्ड केअर सेंटर'ने म्युझिक थेरेपीचा कार्यक्रम हाती घेतला होता. या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ब्रेट लीने देखील हजेरी लावली होती.

थेरेपी अर्थात संगीताच्या माध्यमातून उपचारपद्धती, त्यातील प्रक्रिया, तसेच त्याचे सिद्ध झालेले वैद्यकीय लाभ यांची माहिती जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी ब्रेट ली मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतो. कर्करोगग्रस्त लहान मुले आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनात या उपचारपद्धतीमुळे किती चांगल्या सुधारणा घडून येऊ शकतात, हेही ब्रेट लीने यावेळी लोकांना समजावून सांगितले.

सेंट ज्यूड्स चाईल्ड केअर सेंटरसोबत पुन्हा एकदा मला काम करण्याची संधी मिळाली ही अत्यंत आनंदाची बाब आहे. माझ्या बालपणातील विकासात संगीताने खूप मोलाची भूमिका बजावली आहे. आज मी जो कोणी आहे, त्यात संगीताचा खूप मोठा वाटा आहे. मला पक्की खात्री आहे की, संगीतामुळे जीवनात आमूलाग्र बदल घडून येऊ शकतात. कर्करोगग्रस्त लहानग्यांसाठी या म्युझिक थेरेपीबद्दल जागरुकता निर्माण करण्याचे काम मी करणार आहे.

ब्रेट ली, माजी क्रिकेटपटू

यापूर्वी 2011 साली देखील ब्रेट लीने 'म्युझिक' या आपल्या भारतीय संस्थेमार्फत एका क्लिनिकल म्युझिक थेरेपी प्रोग्रॅमला मदत केली होती. जवळपास 18 महिने चाललेल्या या उपक्रमात अनेक प्रमाणित ऑस्ट्रेलियन क्लिनिकल म्युझिक थेरेपिस्ट्सनी 'सेंट ज्यूड्स चाईल्ड केअर सेंटर'मध्ये मुलांना वेदना व्यवस्थापनात तसेच रुग्णांचे मनोधर्य उंचावण्यात आणि औषधांबरोबर पूरक उपचार प्रदान करण्यात मदत केली होती.

Loading Comments