Advertisement

CA May 2020 परीक्षा रद्द, नोव्हेंबरमध्ये नवं वेळापत्रक

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) सीए परीक्षांचं वेळापत्रक पुन्हा एकदा पुढं ढकलत या परीक्षा नोव्हेंबर २०२० मध्ये घेण्याचं ठरवलं आहे.

CA May 2020 परीक्षा रद्द, नोव्हेंबरमध्ये नवं वेळापत्रक
SHARES

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) सीए परीक्षांचं वेळापत्रक पुन्हा एकदा पुढं ढकलत या परीक्षा नोव्हेंबर २०२० मध्ये घेण्याचं ठरवलं आहे. शुक्रवार ३ जुलै रोजी रात्री उशीरा यासंदर्भातील पत्रक ट्विटर हँडलवर जारी करण्यात आलं. देशभरात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन परीक्षा स्थगित करावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून वारंवार करण्यात येत होती.

‘आयसीएआय’च्या माध्यमातून होणारी सीए परीक्षा २ मे ते १८ मे दरम्यान घेण्यात येणार होती. परंतु देशभरात कोरोना संकटाने हातपाय पसरायला सुरूवात केल्यावर या परीक्षा पुढे ढकलून १९ जून ते ४ जुलै दरम्यान घेण्याचं ठरवण्यालं आलं. पुन्हा या परीक्षा रद्द करुन २९ जुलै ते १६ ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कालावधीत देखील परीक्षा आयोजित करणं शक्य नसल्याने परीक्षा पुढं ढकलून नोव्हेंबर महिन्यात घेण्याचं ठरवण्यात आलं आहे. 

हेही वाचा- NEET, JEE Main 2020 परीक्षा आता सप्टेंबरमध्ये 

‘आयसीएआय’चे परीक्षा विभागाचे अतिरिक्त सचिव एस. के. गर्ग यांनी काढलेल्या या निवेदनात असं म्हटलं आहे की, विद्यार्थ्यांचं हित आणि आरोग्य लक्षात घेऊन आयसीएआयने मे २०२० परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षा नोव्हेंबर २०२० परीक्षांमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे मे २०२० परीक्षेचे शुल्क नोव्हेंबर परीक्षेसाठी लागू करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांनी मे २०२० परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यांच्याकडे त्यांना नोव्हेंबर २०२० परीक्षेसाठी नवा अर्ज करताना आपला ग्रुप आणि परीक्षा केंद्र बदलण्याचा पर्याय उपलब्ध असेल. नोव्हेंबरमध्ये होणारी सीए परीक्षा १ तारखेपासूनच सुरु होईल. मात्र परीक्षा सुरु होण्याआधी परिस्थितीचा आढावा घेतला जाईल.

विद्यार्थ्यांनी इन्स्टिट्यूटच्या अधिकृत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देऊन अद्ययावत माहिती घेत राहावी. विद्यार्थ्यांना नोव्हेंबर २०२० परीक्षेसंदर्भात काही प्रश्न असतील तर ते may2020exam@icai.in या ईमेलवर पाठवू शकतील, असं आवाहनही आयसीएआयने विद्यार्थ्यांना केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान जुलै आणि ऑगस्टमध्ये सीए परीक्षांचं नियोजन करणं कठीण असल्याचं मत संस्थेनं व्यक्त केलं होतं. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सीए परीक्षेच्या आयोजनाची व्यवहार्यता पडताळली जाईल, असं आयसीएआने स्पष्ट केलं होतं. 

संबंधित विषय
Advertisement