आरोग्य मंत्रालयानं परदेशातून येणाऱ्या लोकांसाठी सुधारीत गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. यानुसार परदेशातून आल्यावर ७ दिवस होम क्वारंटाईनची गरज भासणार नाही, तर प्रवाशांना १४ दिवस सेल्फ मॉनिटरिंग करावे लागेल. सेल्फ मॉनिटरिंग दरम्यान प्रवाशाला कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्यानं स्वतःला घरीच वेगळं करावं आणि जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.
रुग्ण केंद्र किंवा राज्य हेल्पलाइन नंबरवर देखील संपर्क करू शकतात. नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार, ज्या लोकांनी कोरोना लसीचा पूर्ण डोस घेतला आहे त्यांना कोरोनाचा RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणे आवश्यक असणार नाही. नवीन मार्गदर्शक तत्त्वे १४ फेब्रुवारीपासून लागू होतील.
यापूर्वी अनेक देशांमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटची वाढती प्रकरणे लक्षात घेऊन भारत सरकारनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. ११ जानेवारी २०२२ रोजी सरकारनं परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी ७ दिवसांचे होम क्वारंटाइन केले.
सर्व प्रवाशांना त्यांची संपूर्ण माहिती हवाई सुविधा पोर्टलवर द्यावी लागेल. त्याचबरोबर प्रवाशाला गेल्या १४ दिवसांच्या प्रवासाच्या नोंदीबाबतही माहिती द्यावी लागणार आहे.
भारतात प्रवास करण्यासाठी प्रवाशाला आरटी-पीसीआर नकारात्मक अहवाल अपलोड करावा लागेल. ही चाचणी प्रवासाच्या तारखेच्या ७२ तासांपूर्वी केली जाऊ नये, चाचणी अहवालाच्या विश्वासार्हतेचे प्रतिज्ञापत्र देखील द्यावे लागेल. यासोबतच प्रवाशाला क्वारंटाईन, आरोग्य निरीक्षणाशी संबंधित सर्व नियमांचे पालन करणार असल्याचे लेखी द्यावे लागेल.
नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार, भारतानं ८२ देशांना जोखीम असलेल्या देशांच्या यादीतून वगळले आहे, ज्यामध्ये कोरोनाचे नवीन प्रकार ओमिक्रॉनची प्रकरणं वेगानं वाढत आहेत.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याच वेळी, ओमिक्रॉनची अधिक प्रकरणे असलेल्या देशांना जोखीम असलेल्या देशांच्या यादीत स्थान देण्यात आले. नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी (DGCA) याबाबत एक निवेदन जारी केलं आहे.
हेही वाचा