Advertisement

चांदिवलीत उभारणार अत्याधुनिक अग्निशमन केंद्र

BMCच्या ₹22.73 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

चांदिवलीत उभारणार अत्याधुनिक अग्निशमन केंद्र
SHARES

मुंबईतील चांदिवली परिसरात अत्याधुनिक आणि पूर्ण क्षमतेचे अग्निशमन केंद्र उभारण्याच्या 22.73 कोटींच्या प्रकल्पाला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

सध्या कार्यरत असलेल्या मिनी फायर स्टेशनच्या जागी हे नवे केंद्र उभारले जाणार आहे. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसाठी सहा मजली निवासी इमारतीचाही समावेश प्रकल्पात करण्यात आला आहे. हा प्रकल्प पुढील दोन वर्षांत पूर्ण होण्याचे नियोजन असून, एम.एम. एंटरप्रायझेस या कंपनीला कामाचा ठेका देण्यात आला आहे.

सध्या चांदिवली आणि साकीनाका परिसरातील आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन गाड्या मरोळ किंवा विक्रोळी येथून पाठवाव्या लागतात. त्यामुळे वेगाने विकसित होत असलेल्या चांदिवली आणि पवई परिसरात आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद देण्यास विलंब होत असल्याची समस्या निर्माण होते. यावर उपाय म्हणून 1,271.63 चौरस मीटर बांधकाम क्षेत्र असलेले स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लेक होम प्रकल्पाजवळ प्रस्तावित असलेल्या या केंद्रात भूतळासह सहा मजली इमारत, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासी व्यवस्था, चार मजली ड्रिल टॉवर, पंप रूम, भूमिगत आणि उंचावरील पाण्याच्या टाक्या, रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रणाली आणि इतर आवश्यक सुविधा असतील.

6 जून 2015 रोजी पवईतील लेक लुसर्न टॉवरमध्ये लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा मृत्यू झाला होता. तर 28 जण जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर या परिसरात पूर्ण क्षमतेचे अग्निशमन केंद्र उभारण्याची मागणी जोर धरू लागली होती.

दरम्यान, चांदिवली आणि पवई परिसरात मोठ्या प्रमाणावर उंच निवासी आणि व्यावसायिक इमारती उभ्या राहत असतानाही हा भाग आजपर्यंत मर्यादित सुविधा, अग्निशमन गाड्यांचा अभाव आणि अपुऱ्या मनुष्यबळासह असलेल्या मिनी फायर स्टेशनवर अवलंबून होता.

सध्या मुंबईत 35 अग्निशमन केंद्रे कार्यरत आहेत. मात्र वाढती लोकसंख्या आणि शहरीकरण लक्षात घेता शहराला किमान 60 अतिरिक्त अग्निशमन केंद्रांची गरज असल्याचे मुंबई अग्निशमन दलाचे मत आहे.

विकास आराखडा 2014-2034 मध्ये 26 नव्या अग्निशमन केंद्रांसाठी भूखंड आरक्षित करण्यात आले आहे. तरी जमीन उपलब्धता आणि संपादनाच्या अडचणींमुळे या प्रकल्पांची गती मंदावली आहे. दरम्यान, मुंबईत दरवर्षी सुमारे 4,500 आगीच्या घटना घडत असल्याने शहराची अग्निसुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज अधोरेखित होत आहे.



हेही वाचा

खड्ड्यांच्या तक्रारींसाठी आता एकच प्लॅटफॉर्म

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा