
मुंबईला (mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणक्षेत्रात जुलै महिन्यातच पावसाने जोर धरल्याने पाणीसाठा 88.49 टक्क्यांवर पोहोचला आहे.
मात्र गेल्या पाच-सहा दिवसांपासून धरणक्षेत्रात पावसाच्या तुरळक सरी बरसत असल्याने पाणीसाठा (water storage) 88 टक्क्यांच्या अवतीभोवती आहे.
तसेच त्यात एल निनोचा प्रभाव असल्याने ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात तुरळक सरी बरसण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मोडकसागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व तानसा या सात धरणांतून मुंबईची तहान भागवण्यासाठी रोज 4,100 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो.
तसेच वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज भासते. सध्या सातही धरणांत 30 जुलै रोजी 12 लाख 80 हजार 786 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे.
एल निनोचा (El nino) प्रभाव असल्याने पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
यामुळे धरणातील पाणीसाठा 100 टक्के होत नाही तोपर्यंत 10 टक्के पाणीकपात लागूच असणार आहे, असे मुंबई महापालिकेच्या जल विभागाकडून सांगण्यात आले.
एल निनोचा प्रभाव असला तरी तुरळक सरींमुळे सातही धरणक्षेत्रातील पाणीसाठा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांत 100 टक्के होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणीसंकट ऑगस्ट महिन्यातच संपुष्टात येईल, अशी चिन्हे आहेत.
सातपैकी चार धरणे (dams) ओव्हरफ्लो झाली असून उर्वरित तीन धरणेही लवकरच तुडुंब भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे सर्व धरणे 100 टक्के भरतील, अशी शक्यता आहे.
हेही वाचा
