Advertisement

घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळून ५ जणांचा मृत्यू


घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळून ५ जणांचा मृत्यू
SHARES

घाटकोपर पश्चिमेकडील जीवदया लेनमध्ये बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीवर गुरूवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास चार्टर्ड विमान कोसळलं. या अपघातात एका पादचाऱ्यासह विमानातील ४ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. सोबतच इमारत परिसरातील २ जण जखमी झाले असून त्यांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे विमान नेमकं कशामुळे कोसळलं याची माहिती अद्याप उपलब्ध झाली नसून या जागेचा ताबा पोलिस आणि अग्निशमन विभागाने घेत आग विझवण्याचं काम सुरू केलं. 



ब्लॅक बाॅक्स मिळाला

मृतांमध्ये महिला पायलट मारिया झुबेरी, को-पायलट प्रदीप राजपूत, एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनीअर सुरभी, मनिष पांडे आणि पादचारी गोविंद पंडीत यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये लवकुश कुमार (२१) आणि नरेशकुमार निशाद (२४) यांचा समावेश आहे. पायलट मारिया आणि सुरभी दोघीही मुंबईतील रहिवासी आहेत. या विमानाचा ब्लॅक बाॅक्स मिळाला असून त्याद्वारे अपघाताच्या कारणाचा शोध लागण्यास मदत मिळणार आहे.  


 

नेमकं काय घडलं?  

दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आकाशातून अचानक हे चार्टर्ड प्लेन ओल्ड मलिक इस्टेट, टेलिफोन एक्सेंजजवळील बांधकाम सुरू असलेल्या पृथ्वी इमारतीवर कोसळलं. जुहू हॅलिपॅडवरून चाचणीसाठी या विमानाने उड्डाण केलं होतं. हे विमान व्हीटी -यूपी झेड किंग एअर सी -९० बनावटीचं असून ते उत्तर प्रदेश सरकारच्या मालकीचं होतं. उत्तर प्रदेश सरकारने हे विमान यू. वाय. एव्हिएशन प्रा.लि. कंपनीला विकलं होतं.  


 

महिला पायलटचं प्रसंगावधान

एकूण १२ आसनी विमानात महिला पायलट आणि ३ एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनीअर (एएमई) बसले होते. या चारही जणांचा दुर्घटनेत मृत्यू झाला. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा परिसर फारसा वर्दळीचा नसल्याने पायलटने प्रसंगावधान दाखवत याठिकाणी क्रॅश लँडिंग केल्याचा कयास लावला जात आहे.




नागरिकांमध्ये घबराट

दुपारी जेव्हा ही घटना घडली, तेव्हा अचानक झालेल्या स्फोटामुळे स्थानिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं.  आगीचे लोळ आणि धुराचे लोळ आकाशाला भिडल्याने हे प्रकरणं नेमकं काय आहे, हे स्थानिकांना कळेनासं झालं. त्यानंतर स्थानिकांनी त्वरीत पोलिस आणि अग्निशमल दलाला कळवल्यानंतर आग विझवण्याचं काम हाती घेण्यात आलं. सध्या परिसरातील स्थिती नियंत्रणात असून अधिक चौकशी सुरू आहे.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा