रेसकोर्ससाठी 'रेस'

  Pali Hill
  रेसकोर्ससाठी 'रेस'
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबईतल्या लीज मालमत्ता भाडेकरार नूतनीकरण धोरणाला पालिकेच्या सुधार समितीत मंजुरी मिळालीय. यात महालक्ष्मी इथल्या रेसकोर्सच्या भूखंडाचा समावेश आहे. शिवसेनेचं इथं थिमपार्क उभारण्याचं स्वप्न असल्यानं सुधार समितीत मंजूर झालेल्या या प्रस्तावाला पालिका सभागृहात रोखण्याची तयारी शिवसेनेनं सुरू केल्याचं पक्षातील खात्रीलायक सूत्रांनी सांगितलंय. मात्र याला भाजप पाठिंबा देण्याची शक्यता धुसर असल्यानं रेसकोर्सवरून वाद रंगण्याची शक्यता आहे.

  पालिकेनं मुंबईतील 234 मोठ्या भूखंडांसह सुमारे चार हजाराहून अधिक भूखंड 10 ते 999 वर्षाच्या भाडे करारावर देण्यात आलेत. यातील काही भूखंडांचे करार कधीच संपलेत. मात्र करार संपुनही हे भूखंड वापरात आहेत. यावर यापूर्वी अनेक वेळा सभागृहात वाद रंगलेत. यात राज्य सरकारचंही भूखंड असल्यानं नूतनीकरण करायचे की भूखंड ताब्यात घ्यायचे याबाबत पालिकेला राज्य सरकारच्या परवानगीचीही प्रतीक्षा होती. त्यामुळे याबाबतचा निर्णय रखडला होता.
  पालिकेने अनेकवेळा लिजधारकाना नोटिसा पाठवल्या, मात्र या नोटिसांना केराची टोपली दाखवण्यात आली. पालिकेनं लीज मालमत्तांचे नूतनीकरणाचे धोरण सुधार समितीत मंजुरीसाठी आल्यावर शिवसेनेनं त्याला विरोध न करता गप्प बसण्याची भूमिका घेतली. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालिकेतील सेना पदाधिकाऱ्यांना खडसावल्यानंतर त्यांची झोप उडालीय. आता अंतिम मंजुरीसाठी जेव्हा पालिका सभागृहात प्रस्ताव येईल त्यावेळी शिवसेनेनं जोरदार विरोध करण्याची भूमिका घेणार असल्याचं सांगण्यात आलं. मात्र या वेळी विरोधकांसह भाजपही एकत्र येऊन यावर शिवसेनेची कोंडी करण्याची शक्यता आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.