Advertisement

“कोस्टल रोडचं काम वेगाने पुढं सरकतंय”

सागरी किनारा म्हणजेच कोस्टल रोडचं काम वेगाने पुढे सरकत असून पावसाळ्यातदेखील पातमुखे ( आऊटफॉल), पंपिंग, खुले नाले या वाटे साचलेल्या पाण्याचा निचरा कशा पद्धतीने वेगाने केला जातो, याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेकडून आढावा घेतला.

“कोस्टल रोडचं काम वेगाने पुढं सरकतंय”
SHARES

सागरी किनारा म्हणजेच कोस्टल रोडचं काम वेगाने पुढे सरकत असून पावसाळ्यातदेखील पातमुखे ( आऊटफॉल), पंपिंग, खुले नाले या वाटे साचलेल्या पाण्याचा निचरा कशा पद्धतीने वेगाने केला जातो, याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेकडून आढावा घेतला. पुराच्या पाण्याचा निचरा होऊन कोस्टल रोड कामातही बाधा येणार नाही तसंच नागरिकांनाही त्रास होणार नाही यासाठी यंत्रणा उभारली असल्याची माहिती यावेळी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सादरीकरणाद्वारे दिली.

मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड यावेळी उपस्थित होते. प्रारंभी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि पी.वेलारासू यांनी सादरीकरण केलं.

७७ पातमुखांची साफसफाई 

प्रियदर्शिनी पार्क, चौपाटी, वरळी सी फेस अशा ठिकाणी एकंदर ७७ पातमुखे ( आऊटफॉल) असून त्यातील ४३ हे समुद्रकिनाऱ्याला समांतर असे आहेत. सर्व पातमुखांची व्यवस्थित साफसफाई करण्यात आली आहे. अमरसन्स इंटरचेंज, हाजी अली इंटरचेंज, चौपाटी याठिकाणी पुरेशा क्षमतेचे पंप्स बसविण्यात आले आहेत. कोस्टल रोडला लागून १५ ठिकाणी असे ६३ पंप्स आहेत.

पावसाळा सुरु झाला असून पाण्याचा निचरा वेळोवेळी होऊन पाणी साचणार नाही तसंच कामातही बाधा येणार नाही अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

सागरी मार्गाचं ३६ टक्के काम पूर्ण

१०.५८ किमीच्या या सागरी मार्गाचे काम ३६ टक्के पूर्ण झालं असून या प्रकल्पावर एकूण १२ हजार ७२१ कोटी खर्च येणार आहे. प्रत्येकी तिहेरी मार्गाचे २ मोठे बोगदे यात बांधण्यात येत आहेत. १५. ६६ किमीचे इंटरचेंजेस मार्गदेखील असणार आहेत. आतापर्यंत बोगदा खणण्याचं काम ९ टक्के, रिक्लेमेशन ९० टक्के, सागरी भिंत ६८ टक्के अशी कामाची प्रगती आहे.

भूमिगत टाक्या

यावेळी विशेषत: हिंदमाता, गांधी मार्केट, चुनाभट्टी- कुर्ला सायन रेल्वे स्थानक परिसर इथं पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी करीत असलेल्या उपाययोजनांची माहितीही अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली.

दरवर्षी हिंदमाता आणि गांधी मार्केट या सखल भागांमध्ये पाणी साचून होणाऱ्या त्रासावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येत असून या दोन्ही ठिकाणी पाणी साठवणाऱ्या भूमिगत स्वरूपाच्या मोठ्या टाक्या बांधण्यात येत आहेत. सखल भागात पावसाचे पाणी भरू लागले तर ते या टाक्यांमध्ये सोडण्यात येईल. भरती ओसरल्यानंतर हे पाणी समुद्रात सोडण्यात येईल. यामुळे पाणी साचणार नाही, अशी माहिती यावेळी देण्यात आली.  हिंदमाता परिसरातील साचणारे पाणी हे प्रमोद महाजन उद्यानातील भूमिगत टाक्यांमध्ये कसे साठविण्यात येईल याविषयीची चित्रफितही दाखविण्यात आली.

हिंदमाता परिसरात वाहतूक थांबली नाही

पुढच्या वर्षीपासून या कामामुळे  हिंदमाता परिसराला मोठा दिलासा मिळेल असेही सांगण्यात आले. यंदा परळ उड्डाणपूल आणि हिंदमाता उड्डाण पुलादरम्यान जोडरस्ता असून दोन्ही पुलांच्या मधील रस्त्याची उंची वाढविण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात पाणी तुंबले तरी वाहतूक सुरळीत सुरू राहिली, असंही पालिका आयुक्तांनी सांगितलं.

गाळ काढण्याच्या कामाचं संगणकीय संनियंत्रण

९ जून रोजी मुंबईत २० ठिकाणी २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला तर ११ ठिकाणी १५० मिमी ते २०० मिमी, १३ ठिकाणी १०० मिमी ते १५० मिमी  आणि ३ ठिकाणी १०० मिमीपेक्षा कमी पाऊस झाला. मुंबईत ३८६ पुराचं पाणी साचण्याची ठिकाणे असून १७१ ठिकाणांवर पाणी साचणार नाही किंवा लगेच निचरा होईल यासाठी उपाययोजना केली असून जून अखेर इतर ठिकाणांची कामेही पूर्ण होतील. 

२४ प्रभागात ६ मीटर पेक्षा कमी रुंद नाल्यांची १०० टक्के साफसफाई झाली आहे. नाल्यातून गाळ काढणे व त्याची मुंबईबाहेर विल्हेवाट लावणं या संपूर्ण प्रक्रियेवर संगणकीय पद्धतीने नियंत्रण ठेवलं जातं व प्रत्येक वाहनाच्या फेऱ्या, वाहून नेलेला गाळ, वजन  याची छायाचित्रांसह व्यवस्थित नोंद ठेवली जाते याविषयी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी माहिती दिली.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा