सार्वजनिक शौचालयांमध्ये कमोड

  BMC
  सार्वजनिक शौचालयांमध्ये कमोड
  मुंबई  -  

  मुंबईतील अनेक जुन्या चाळी, इमारतींसह झोपडपट्टींमध्ये सार्वजनिक शौचालयांची सुविधा उपलब्ध करून दिली जात असली, तरी या शौचालयांमध्ये जुन्या पद्धतीचे शौचकुप बनवले जातात. परंतु या शौचालयांमध्ये जाताना वयोवृद्धांना होणारा त्रास लक्षात घेता नव्याने बांधण्यात येणाऱ्या सार्वजनिक शौचालयांमध्ये पाश्चिमात्य शौचकुप अर्थात कमोड बसवणे बंधनकारक करण्याची मागणी नगरसेवकांकडून होत आहे.

  सर्व सार्वजनिक शौचालयांमध्ये बैठक व्यवस्था ही भारतीय पद्धतीची बसवण्यात आल्याने वार्धक्याने आजारी पडणाऱ्या वयोवृद्धांना याचा वापर करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे वयोवृद्धांना सोयीची व्यवस्था शौचालयात उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्यामुळे नव्याने बांधण्यात येणाऱ्या सार्वजनिक शौचालयांमध्ये किमान एका शौचालयात पाश्चिमात्य शौचकुप अर्थात कमोड बसवणे बंधनकारक करावे, अशी मागणी शिवसेना नगरसेविका अरुंधती दुधवडकर यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे केली आहे.

  गटारे, सार्वजनिक शौचकुप, मुताऱ्या तसेच सेवा सुविधांची उपलब्ध करून त्या सुस्थितीत ठेवणे, साफ करणे हे महापालिकेचे बंधनकारक कर्तव्य आहे. त्यानुसार महापालिकेच्या हद्दीमध्ये ठिकठिकाणी सार्वजनिक शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मात्र अशा सर्व सार्वजनिक शौचालयांमध्ये बैठक व्यवस्था भारतीय पद्धतीची असल्याने वयोवृद्धांना याचा वापर करताना त्रास होत असतो, त्यामुळे ही किमान एका शौचालया नव्या पद्धतीची आसन व्यवस्था बसवणे गरजेचे असल्याचे दुधवडकर यांनी म्हटले आहे.

  सार्वजनिक शौचालयांमधील दिवाबत्तीच्या मोफत सुविधा

  मुंबईच्या हद्दीमध्ये अन्य प्राधिकरणांमार्फत बांधलेल्या तसेच नव्याने बांधण्यात येणाऱ्या सर्व सार्वजनिक शौचालयांमध्ये पाणी आणि दिवाबत्तीची मोफत सुविधा पुरवण्याबाबतचे एकसमान धोरण आखण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आह.

  मुंबईत म्हाडासह अन्य प्राधिकरणांमार्फत बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेची, सुरक्षिततेची आणि देखभालीची जबाबदारी ही संबंधित प्राधिकरणाची आहे. परंतु अनेक ठिकाणी या शौचालयांची देखभाल त्या प्राधिकरणामार्फत योग्यप्रकारे केली जात नाही. परिणामी शौचालयांमध्ये अस्वच्छता असल्यामुळे झोपडपट्टयांमध्ये स्वच्छता अभियान, दत्तक वस्ती योजना, घर-घर शौचालय, इत्यादी योजना राबवत असल्यामुळे संबंधित परिसर स्वच्छ राहण्यास मदत होत असते. त्याच धर्तीवर मुंबईतील अन्य कोणत्याही प्राधिकरणाने बांधलेल्या सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, पाणी दिवाबत्तीची तरतूद आणि देखभाल यांची जबाबदारीही महापालिकेने घेतल्यास सर्व परिसर स्वच्छ होऊन नागरिकांना दिलासाच मिळेल, असे सईदा खान यांनी स्पष्ट केले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.