Advertisement

हँकॉक पुलाच्या शुभारंभ कार्यक्रमावर काँग्रेसचा बहिष्कार, आता दुसऱ्यांदा शुभारंभ


हँकॉक पुलाच्या शुभारंभ कार्यक्रमावर काँग्रेसचा बहिष्कार, आता दुसऱ्यांदा शुभारंभ
SHARES

मुंबईतील वादग्रस्त हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणी कामाचा शुभारंभ सोमवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याहस्ते करण्यात आला. पण या पुलाच्या शुभारंभ कार्यक्रमासंदर्भात आपल्याला विश्वासात न घेता कार्यक्रमापूर्वी केवळ १२ तास आधीच निमंत्रण पत्रिका दिली गेली असल्याने याचा निषेध म्हणून काँग्रेस नगरसेविका सोनम जातसूतकर आणि निकीत निकम यांनी बहिष्कार घातला. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणाऱ्या काँग्रेसतर्फे मंगळवारी सकाळी या पुलाच्या पुनर्बांधणी कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे एकाच कामाचे दोनदा शुभारंभ कार्यक्रम झाले आहे.


नगरसेविकांनाच डावलण्याचा प्रयत्न

डोंगरी नूरबाग सर्कल येथे हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणीचा शुभारंभ महापौरांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत स्थानिक नगरसेविका सोनम जामसूतकर आणि निकीता निकम यांना डावलण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र एकीकडे या स्थानिक नगरसेविकांना या कार्यक्रमाची कोणतीही कल्पना नसताना सभागृहनेते यशवंत जाधव यांनी विभागात महापौरांच्याहस्ते होणाऱ्या कार्यक्रमाची जाहिरातबाजी करून परिसर भगवेमय केलं होतं. परंतु याबाबत माजी नगरसेवक मनोज जामसूतकर आणि ज्ञानराज निकम यांनी प्रशासनाला नियम लक्षात आणून दिल्यानंतर या दोघींना संयुक्तपणे अध्यक्षस्थान देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या दोघींची नावे अध्यक्षस्थानी टाकण्यात आली होती.


बांधकामाचं श्रेय यशवंत जाधवांना

या पुलाच्या पुनर्बांधणीचा शुभारंभ करताना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी, मुंबई शहरात हँकॉक पुलाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हा पूल नव्याने बांधण्यात यावा यासाठी सभागृह नेता आणि स्थानिक नगरसेवक यशवंत जाधव यांनी महापालिकेच्या विविध अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा पूल बांधण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केलेला आहे. महापौर दालनातही याबाबत वेळोवेळी बैठका घेण्यात आल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले. महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात विविध प्रकल्प आणि उपक्रमाची कामे सुरू आहेत. ही कामे होत असताना ती मुदतीत आणि गुणवत्तापूर्णच केली जावीत यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आदेशही महापौरांनी प्रशासनास दिले.


'त्या' नगरसेविका अनुपस्थित का राहिल्या?

स्थानिक नगरसेवक म्हणून आपल्याला विश्वासात घ्यावे, आपल्याला मान मिळावा म्हणून सोनम जामसूतकर आणि निकीता निकम यांचा अट्टाहास होता. त्याप्रमाणे त्यांना अध्यक्षस्थान दिलेही. मग एवढा मान देऊनही त्या गैरहजर का राहिल्या, असा प्रश्न सभागृहनेते यशवंत जाधव यांनी केला.


काँग्रेसतर्फे मंगळवारी शुभारंभ

सभागृहनेते हे सत्ताधारी पक्षाचे असून त्यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून या दोन्ही नगरसेविकांना या पुलाच्या शुभारंभ कार्यक्रमापासून अंधारात ठेवण्याचा प्रयत्न केला. यशवंत जाधव हे दोन दिवसांपासून याठिकाणी शुभारंभ कार्यक्रमाबाबत वातावरण निर्माण करत आहे. परंतु, याबाबत जेव्हा ज्यांच्या हस्ते हा शुभारंभ केला जाणार आहे, त्यांना विचारले असता ते आपल्याला काहीच माहीत नसल्याचं सांगतात. प्रशासनाचे अधिकारी काही सांगत नाही. मात्र, या अधिकाऱ्यांना कायदे आणि नियमांची भाषा ऐकल्यावर ते निमंत्रण पत्रिकेवर नाव टाकतात. त्यामुळे याचा निषेध म्हणून या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहिलेलो नाहीत. परंतु आम्ही आमच्या जनतेच्या आग्रहास्तव याचा मंगळवारी शुभारंभ कार्यक्रमाचं आयोजन केलं असून त्याप्रमाणे तो कार्यक्रम केला जाईल, असे काँग्रेस नगरसेविका सोनम जामसूतक यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा