Advertisement

१ ते ३१ जुलैदरम्यान होणार विद्यापीठाच्या परीक्षा?


१ ते ३१ जुलैदरम्यान होणार विद्यापीठाच्या परीक्षा?
SHARES

कोरोना व्हायरसमुळं मुंबईसह राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ऐन परीक्षांच्या तोंडावर लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानं विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आलं नाही. लॉकडाउनमुळं देशातील सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा रखडलेल्या आहेत. मात्र, आता या परीक्षा १ ते ३१ जुलै या कालावधीत घ्याव्यात, तसंच अंतर्गत मूल्यमापनासाठी आवश्यक प्रकल्प १६ ते ३० मे या कालावधीत पूर्ण करावेत, अशा शिफारशी परीक्षा आणि शैक्षणिक वर्ष वेळापत्रक तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीनं विद्यापीठ अनुदान आयोगाला केल्या आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोगानं हरयाणा येथील केंद्रीय विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. आर. सी. कुहाड यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची स्थापना केली होती. या समितीनं आपल्या अहवालात १५ मेपर्यंत ई-लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात यावं व यानंतर १६ ते ३१ मे या कालावधीत प्रोजेक्ट वर्क, ई-लॅब, अभ्यासक्रमाची पूर्तता, अंतर्गत मूल्यमापन आदी बाबी पूर्ण करण्यात याव्यात, असं म्हटलं आहे.

त्यानंतर जून महिन्यात उन्हाळी सुट्टी असेल व ही सुट्टी संपल्यावर १ ते १५ जुलै या कालावधीत टर्मिनल सेमिस्टर परीक्षांचं आयोजन करून त्याचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करावा. १६ ते ३१ जुलै इंटरमीडिएट सेमिस्टर परीक्षा घेऊन त्याचा निकाल १४ ऑगस्टपर्यंत जाहीर करावा, अशा शिफारशी करण्यात आल्या आहेत. परीक्षा घेताना विद्यापीठांनी बहुपर्यायी, ओएमआर आधारित परीक्षा, ओपन बुक परीक्षा, प्रकल्पाधारित परीक्षा या पर्यायांचा वापर करावा, असेही सूचित करण्यात आलं आहे.

परीक्षा घेताना ७०:३०चे सूत्र वापरावे. म्हणजे ७० गुणांची परीक्षा विद्यापीठ घेईल, तर ३० गुणांची परीक्षा अंतर्गत मूल्यमापनाद्वारे घ्यावी, अशी शिफारसही यात करण्यात आली आहे. तसंच, विद्यापीठ त्यांच्या स्तरावर विविध संकल्पनांचा वापर करून परीक्षांचं नियोजन करू शकतात, असंही समितीनं सुचवलं आहे. एकाचवेळी जास्त विद्यार्थ्यांना न बोलावता दिवसभरात २वेळा एकाच इयत्तांच्या परीक्षांचं आयोजनही करता येऊ शकेल. याच पद्धतीचा वापर अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठीही होऊ शकतो, असंही समितीनं म्हटल्याचं समजतं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा