Advertisement

दक्षिण आफ्रिकेतून १०००च्या आसपास प्रवासी मुंबईत- आदित्य ठाकरे

दक्षिण आफ्रिकेतून गेल्या १९ दिवसांत १०००च्या आसपास प्रवासी मुंबईत आल्याची धक्कादायक माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

दक्षिण आफ्रिकेतून १०००च्या आसपास प्रवासी मुंबईत- आदित्य ठाकरे
SHARES

कोरोनाच्या नवा विषाणू ओमायक्रॉननं दहशतीचं वातावरण निर्माण केलं आहे. दक्षिण आफ्रिकेतून गेल्या १९ दिवसांत १०००च्या आसपास प्रवासी मुंबईत आल्याची धक्कादायक माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या या नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर अनेक देशांनी त्यांच्यावर निर्बंध आणली आहेत.

केंद्र सरकारसोबत राज्य सरकारने तेथून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध आणले असताना आदित्य ठाकरेंनी दिलेल्या माहितीने चिंता वाढवली आहे. आदित्य ठाकरे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी याबाबत माहिती दिली.

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १०००च्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत. आतापर्यंत जे लोक आलेत त्यांची माहिती आपण मिळवली आहे. जे मुंबईत आहेत त्यांना महापालिकेकडून फोन केले जात आहेत. यासोबतच परदेशातून आलेल्या गेल्या १० दिवसांतील सर्वांना संपर्क साधून विचारपूस केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसंच संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था केली जात असल्याचं त्यांनी म्हटलं.

कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती नियमितरित्या मिळत राहावी, जेणेकरून त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल व संसर्गाला वेळीच रोखण्यात यश मिळेल असं सांगितलं.

ज्या देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे तेथील लाट सर्वात मोठी असून, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, ऑस्ट्रिया या देशांमध्ये दर दिवशी ३० हजारांपेक्षा जास्त लोक करोनाग्रस्त झालेले आढळत आहेत. ओमिक्रॉन विषाणुचे ५० पेक्षा जास्त म्युटेशन आहेत.

सध्याच्या आरटीपीसीआर चाचणीत या व्हेरियंटची लागण असल्यास एस जिन आढणार नाही. सध्या तरी प्रतिबंधासाठी मास्क सर्वात जास्त आवश्यक आहे. केंद्र सरकारने १२ देशातल्या प्रवाशांची तेथून विमानात बसण्यापूर्वी ७२ तास अगोदर आरटीपीसीआर चाचणी आवश्यक केली असून इथं उतरल्यावर परत एकदा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. तसंच ७ दिवसांसाठी विलगीकरण आवश्यक आहे.

परदेशातून येणारे प्रवासी थेट मुंबईत किंवा महाराष्ट्रातील इतर विमानतळांवर न उतरता देशात इतरत्र उतरून नंतर देशांतर्गत विमानसेवेने किंवा रस्ते आणि रेल्वे मार्गे आल्यास त्यांची तपासणी कशी करणार हा सध्याचा प्रश्न असून पंतप्रधानांना देखील यासंदर्भात अवगत करण्यात यावे यावर बैठकीत चर्चा झाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशभरातील आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत विमानसेवांनी प्रवाशांची माहिती नियमितपणे एकमेकांना दिल्यास रुग्ण प्रवासी तसेच त्यांच्या संपर्कातील प्रवासी शोधणे सोपे जाईल असं सांगितलं.

मास्क वापरणं गरजेचं आहे असं सांगत ओमिक्रॉनची लागण होण्याची गती सध्याच्या व्हेरियंटपेक्षा ५ पटीने जास्त आहे अशी माहिती राजेश टोपे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर दिली. यापुढे केंद्राने सांगितलेल्या १३ देशातून येणाऱ्या प्रवाशांना थेट विमानतळावर क्वारंटाईन केलं जाणार असून आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याशिवाय विमान प्रवास करता येणार नाही असाही निर्णय घेतल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

औरंगाबाद, मुंबई, नागपूर पुणे या विमानतळावर देखील प्रवाशांच्या चाचण्या घेतल्या जातील असंही टोपे यांनी सांगितलं. मुंबईहून दिल्लीला जायचं असेल आणि तिथून पुन्हा मुंबईला यायचं असेल तरीही RTPCR चाचणी अहवाल निगेटिव्ह असायला हवा अशी माहिती देखील टोपे यांनी दिली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा