Advertisement

एक प्रवास अमिताभचा आणि आपलाही!

अमिताभचं सोडा, प्रसारमाध्यमांचं सोडा- त्यांचे व्यवसाय आहेत, आपलं काय? आपल्यासाठी आपल्यात झालेला बदल हा सगळ्यात महत्त्वाचा असला पाहिजे…

एक प्रवास अमिताभचा आणि आपलाही!
SHARES

अभिनेता अमिताभ बच्चन ‘कुली’च्या सेटवर जबर जखमी; अमिताभची प्रकृती चिंताजनक, देशभर अमिताभसाठी प्रार्थना

साल १९८२

महानायक अमिताभ बच्चन कोरोनाबाधेमुळे रुग्णालयात दाखल; देशभरात मीम्सचे फुटले पेव

साल २०२०

१९८२ ते २०२०… ३८ वर्षांचा काळ लोटला आहे.

या काळात काय काय बदललं, हे पाहायचं तर अमिताभचं तेव्हाचं आजारपण आणि आताचं आजारपण यांच्यातला फरक तपासायला हवा.

१९८२ सालात, तेव्हाचा सुपरस्टार बनलेल्या अमिताभच्या गंभीर दुखापतीनंतरची देशाची प्रतिक्रिया पाहा आणि आज अमिताभ कोविड पाॅझिटिव्ह आहे आणि नानावटी रुग्णालयात दाखल झाला आहे, हे कळल्यानंतरची प्रतिक्रिया पाहा… दोहोंमध्ये जमीन-अस्मानाचं अंतर आहे.

१९८२ साली बंगलोरमध्ये ‘कुली’च्या सेटवर एका अॅक्शन सीनचं चित्रिकरण सुरू असताना पुनीत इस्सार या अभिनेत्याचा चुकून वर्मी बसलेला ठोसा अमिताभला मरणाच्या दारात घेऊन गेला. आधी बंगलोरमध्ये उपचार झाल्यानंतर त्याला चिंताजनक स्थितीत विमानाने मुंबईला आणण्यात आलं. इथे ब्रीच कँडी रुग्णालयात डाॅक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून त्याला वाचवलं. असं म्हणतात की एका क्षणी अमिताभ गेलेला होता. त्याच्या शरीराचे जिवंतपणाचे सगळे पॅरामीटर थांबले होते. डाॅक्टर फक्त अधिकृत घोषणा करायचेच बाकी होते. पण, कुठून कशी पुन्हा धुगधुगी आली आणि अमिताभ मरणाच्या दाढेतून परत आला.

अमिताभच्या त्या आजारपणाने अख्ख्या देशाचा जीव दोन महिने टांगणीला लागला होता. देवळं, मशिदी, चर्चेस, सगळीकडे त्याच्यासाठी लोक करूणा भाकत होते, नवस बोलत होते. दोन महिने अमिताभचं आजारपण वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर ठाण मांडून बसलं होतं. पण, कुणालाही हे तेव्हाच्या राजकीय परिस्थितीवरून लक्ष उडवण्याचं कारस्थान वाटलं नव्हतं. अमिताभने घरी आल्यानंतर एक व्हिडिओ चित्रित करून त्यात बंगलोरच्या सेंट फिलोमिनो हाॅस्पिटलचे आणि ब्रीच कँडी हाॅस्पिटलचे, दोन्हीकडच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे, डाॅक्टरांचे आभार मानले होते. पण, त्याची या दोन हाॅस्पिटलांमध्ये गुंतवणूक आहे आणि तो त्यांचा पीआर करतो आहे, अशी काही कुणाची भावना झाली नव्हती.

मात्र, २०२० साली, कोरोनाच्या कहरात काय झालं?

सत्तरीच्या उत्तरार्धाकडे निघालेल्या अमिताभसारख्या, अनेक आजारपणं, व्याधी अंगात असलेल्या, निव्वळ इच्छाशक्तीच्या बळावर थकलेल्या शरीरात अभूतपूर्व ऊर्जा आणून रोज झपाट्याने काम करणाऱ्या अभिनेत्याला कोविड १९ची बाधा होणं ही काळजी निर्माण करणारी गोष्ट असायला हवी. तो हाय रिस्क गटात आहे, शिवाय देशाचा, दादासाहेब फाळके पुरस्कारविजेता महानायक आहे. त्याला कोरोना झाला ही बातमी आली, पाठोपाठ त्याचा मुलगा अभिषेक यालाही कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली आणि अनेकजण काळजीने चुकचुकले.

मात्र, तेवढंच झालं नाही. कुणीतरी अमिताभचा, आधीच्या आजारपणातला नानावटी रुग्णालयातल्या डाॅक्टर-कर्मचाऱ्यांचे आभार मानणारा व्हिडिओ, जणू त्या रात्रीचाच आहे, अशा पद्धतीने व्हायरल केला. मग अमिताभची नानावटी हाॅस्पिटल चालवणाऱ्या संस्थेत गुंतवणूक आहे, म्हणून तो डॅमेज कंट्रोल करायला तिथे भर्ती झाला आहे इथपासून ते कोरोनाकाळात रुग्णांना लुटणारं हाॅस्पिटल म्हणून नानावटीची जी बदनामी झाली होती, ती धुवून काढण्यासाठी हा पीआर उपक्रम करण्यात आला आहे, इथपर्यंत अनेक प्रकारच्या चर्चांना सुरुवात झाली. त्याचवेळी अभिनेत्री रेखा हिच्या बंगल्याचा वाॅचमन कोरोना पाॅझिटिव्ह निघाल्याची बातमी आल्यानंतर या दोन्ही बातम्या एकमेकींना जोडून एक वेगळाच ‘सिलसिला’ जुळवण्याचाही प्रकार समाजमाध्यमांत घडला, काही माध्यमांनीही तशी मांडणी केली. 

अमिताभची सून ऐश्वर्या आणि नात आराध्या याही कोरोना पाॅझिटिव्ह आहेत, ही बातमी आल्यानंतर अमिताभचं आजारपण खोटं आहे, बनाव आहे, असं सांगणाऱ्या तोफा थंडावल्या… पण मग अमिताभच्या बंगल्यांमध्ये आयसीयू असताना, पदरी डाॅक्टर असताना घरात क्वारंटाइन होण्याचं सोडून हे बापलेक हाॅस्पिटलमध्ये का भर्ती झाले, असा प्रश्न विचारणं सुरू झालं…

…तो वृद्ध आहे, हाय रिस्क गटात आहे, कोरोना हा भलताच विचित्र प्रकारे आघात करून जीवन संपवू शकतो, अमिताभची प्रकृती बिघडू शकते, त्याच्यासाठी प्रार्थना करायला हवी, असं फारच कमी लोकांना सुचलं असेल या धबडग्यात… त्यात नंतर न्यूज चॅनेलांनी हाॅस्पिटलबाहेर ओबी व्हॅन लावून ‘अमिताभने सकाळी नाश्ता केला (केवढी मौलिक माहिती, त्याने सकाळी ‘डिनर’ केलं असतं तर अधिक मोठी बातमी झाली असती म्हणा!) अशा ब्रेकिंग न्यूज चालवून अमिताभच्या आजारपणाचं रूपांतर काॅमेडी शोमध्ये करून टाकलं…

हे सगळं काय चाललं आहे आणि काय चाललं आहे?

गेल्या ३८ वर्षांत नेमकं काय बदललं आहे?

एकतर प्रसारमाध्यमं बदलली आहेत… 

…१९८२ साली वर्तमानपत्रं आणि दूरदर्शन यापलीकडे माध्यमं नव्हती, कुणाला २४ तास बातम्या पाहायची गरज नव्हती आणि असंपादित घडामोडींचं थेट चित्रण ‘बातमी’ म्हणून खपवण्याची चढाओढ नव्हती. समाजमाध्यमं म्हणजे सोशल मीडिया नव्हता, त्यात अपप्रचारासाठी नेमलेल्या पगारी यंत्रणा नव्हत्या. त्यांच्या एकमेकांवरच्या कुरघोड्या नव्हत्या.

दुसरी गोष्ट म्हणजे अमिताभ बदलला आहे.

१९८२ साली अमिताभ चोख व्यावसायिक अभिनेता होता, पण त्याचा अभिनय रूपेरी पडद्यापुरता मर्यादित होता. तेव्हा त्याला त्याच्या अस्तित्त्वाचा प्रत्येक क्षण वेगवेगळ्या प्रकारे एन्कॅश करण्याची सोय नव्हती. दरवेळी सोयीस्कर भूमिका घेऊन नवनवीन सत्ताधीशांबरोबर जुळवून घ्यायचं, त्यांच्यासाठी हितकारक कृती करायच्या, ट्वीट करायची, असं सगळं करणारा अमिताभ आजच्या युगाने पाहिला आहे. छोट्या पडद्यावर तो काय विकताना दिसलेला नाही? डोकं थंड करणाऱ्या तेलापासून ते च्यवनप्राशपर्यंत, सोन्याच्या दागिन्यांपर्यंत काहीही विकायला तो तयार असतो. तो आजारपणाचं पॅकेज डील करू शकत नाही? यावर खात्रीने उत्तर देता येणं कठीण आहे. आजची स्टार मंडळी इन्स्टाग्रामवर फोटो डकवण्याचे, ट्वीट लिहिण्याचे, विशिष्ट ब्रँडचे कपडे परिधान करण्याचे कोट्यवधी रुपये घेत असतात… अमिताभ तर महानायक आहे… या इंडस्ट्रीला व्यावसायिकतेची वेगळी वाट दाखवणारा महानायक.

मात्र, १९८२ ते २०२० या काळात सगळ्यात मोठा बदल झाला आहे तो आपल्यात… 

अमिताभचं सोडा, प्रसारमाध्यमांचं सोडा- त्यांचे व्यवसाय आहेत, आपलं काय? आपल्यासाठी आपल्यात झालेला बदल हा सगळ्यात महत्त्वाचा असला पाहिजे…

…आपण आता काॅन्स्पिरसी थियरिस्ट बनलो आहोत… खासकरून सोशल मीडियाच्या अस्ताव्यस्त प्रसारानंतर आपल्यातला सिनिसिझम वाढलेला आहे. कोणत्याही सकारात्मक गोष्टीवर आपला विश्वास राहिलेला नाही. गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत असंख्य खोट्यानाट्या गोष्टी आलेल्या आहेत. आपण भाबडेपणाने एखाद्या माहितीवर विश्वास ठेवतो आणि काही क्षणांतच तो कसा आयटी सेलचा उद्योग आहे, तथ्य काही वेगळंच आहे, हे सांगणारी माहिती पुढे येते… याने आपल्यात एक संशयात्मा जागा झाला आहे… तो आपल्याला सगळ्या गोष्टींमध्ये संशय घ्यायला लावतो… हे असं नसणारच, याच्यामागे काहीतरी कारस्थानच असणार, असं वाटायला लावतो…

…अमिताभवर नानावटीची टीम उपचार करते आहे… तो जिगरबाज आहे… मृत्यूच्या दारातून अनेकदा परत आलेला आहे… तो बरा होईलच… आपण बरे कसे होणार?

हेही वाचा - वैद्यकीय तपासणी करून घ्यायलाच हवी… हो ना?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा