Advertisement

वैद्यकीय तपासणी करून घ्यायलाच हवी… हो ना?

लाॅकडाऊन उठवला जाण्याचा टप्पा आला तेव्हा सगळ्यात आधी फोन गेले ते मदतनीस महिलांना. त्यांच्याकडेही हीच परिस्थिती होती, उलट आणखी वाईट. त्यामुळे त्यांनाही काम कधी सुरू होतंय, याचीच प्रतीक्षा होती. त्यांचं पुन्हा कामावर रुजू होणं वाटतं तेवढं सोपं नव्हतं.

वैद्यकीय तपासणी करून घ्यायलाच हवी… हो ना?
SHARES

“हॅलो ताई, कधीपासून यायचं कामावर?”

“हॅलो ताई, कधीपासून येताय कामावर?”

करोनाच्या फटक्याने लादलेल्या लाॅकडाऊनला अनलाॅक केल्या जाण्याच्या टप्प्यात घराघरांतून असे फोन झाले असतील आणि आले असतील… घरांतल्या गृहिणी आणि त्यांना घरकामात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या स्त्रिया यांच्यातले हे संवाद होते…

…लाॅकडाऊनचा कौटुंबिक फटका सगळ्यात जास्त कुणाला बसला असेल तर तो घरातल्या स्त्रियांना. घरातले बाकीचे सगळे सदस्य सर्व वेळ घरात, सगळ्यांचं तिन्ही वेळचं जेवण, नाश्ता सगळं घरात आणि कामासाठी येणाऱ्या मदतनीस स्त्रियांचा हातभार मात्र पूर्णपणे बंद झालेला, अशी वेळ गृहिणींवर आली. ज्या घरांमध्ये घरातली कामं सगळ्यांनी करण्याचा परिपाठ आहे, तसा संस्कार आहे, तिथे गृहिणींवरचा भार थोडा हलका झाला असेल. पण, बाकी ठिकाणी स्त्रिया मेटाकुटीला आल्या. त्यात नोकरदार स्त्रियांपैकी ज्यांच्या कामाचं स्वरूप आॅनलाइन किंवा वर्क फ्राॅम होम पद्धतीने करण्यासारखं आहे, त्यांच्यासाठी तर लाॅकडाऊन हा फारच मोठा ताप झालेला आहे. जेव्हा लाॅकडाऊन नव्हता, तेव्हाही घरातल्या सगळ्या कामांची, स्वयंपाकाची जबाबदारी त्यांच्यावरच होती. पण, त्यातून निदान आॅफिस अवर्सचा ब्रेक तरी होता. आता ती कामंही करायची, आॅफिसचं कामही करायचं आणि दिवसभर सगळ्यांच्या मागण्यांना तोंड द्यायचं यात त्या पिचून गेल्या. हीच परिस्थिती एकाकी वृद्धांचीही झाली आहे. त्यांना बाहेरून जेवणखाण मिळू शकत नाही आणि घरातली सगळी कामं त्यांना करता येत नाहीत. पण, त्यांना मदत मिळणं अशक्यच होऊन बसलं आहे या काळात. 

त्यामुळे लाॅकडाऊन उठवला जाण्याचा टप्पा आला तेव्हा सगळ्यात आधी फोन गेले ते मदतनीस महिलांना. त्यांच्याकडेही हीच परिस्थिती होती, उलट आणखी वाईट. त्यामुळे त्यांनाही काम कधी सुरू होतंय, याचीच प्रतीक्षा होती. मात्र, त्यांचं पुन्हा कामावर रुजू होणं वाटतं तेवढं सोपं नव्हतं आणि आजही नाही.

कारण, एकीकडे सरकारने असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की वर्तमानपत्रं टाकणारे विक्रेते, दूधविक्रेते आणि घरकाम करणाऱ्या महिलांना कोणत्याही सोसायटीत मज्जाव करू नये. पण तसं वास्तवात घडताना दिसत नाही. सगळ्या बृहन्मुंबई परिसरात रोज तक्रारी येतात, अनेक माणसं सोसायट्यांच्या मनमानीविरोधात लिहितात, पण, बहुतेक सोसायट्यांनी या सगळ्यांना आवारात यायला मज्जाव केलेला आहे आणि तो कायम ठेवलेला आहे.

सोसायट्यांच्या म्हणजे पदाधिकाऱ्यांच्या बाजूने पाहिलं तर त्यांचीही काही चूक नाही. एखाद्या सोसायटीत करोनाचा शिरकाव झाला तर पदाधिकारीच सदस्यांच्या रोषाचे धनी होतात. नसती जबाबदारी घेईल कोण? बाहेरून कोणाला येऊ दिलं नाही आणि इमारतीत किंवा सोसायटीत करोना शिरला तर त्यात सदस्यांच्या बेजाबाबदारपणाला जबाबदार धरता येतं. बाहेरून येणाऱ्यांना परवानगी देणं म्हणजे करोनाला आमंत्रण देणं अशीच समजूत सगळीकडे प्रबळ आहे.

हेही वाचा - कोरोना चालेल, राजकारण नको!

तिच्यात तथ्य आहे का?

निश्चितच आहे. 

वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये काम करणारी मदतनीस महिला जिथे राहते, तिथे करोनाचा संसर्ग तिला होऊ शकतो, ती जिथे काम करते, तिथे तिला संसर्ग होऊ शकतो. तो संसर्ग घेऊन ती सगळीकडे फिरणार तर कॅरियर म्हणूनच वावरणार. शिवाय हा रोग असा की यात असिम्प्टोमॅटिक म्हणजे लक्षणंच न दाखवणारे रोगी खूप आहेत. आपल्याला करोनाची लागण झालेली आहे हे त्यांना कळतही नाही. ते अंगभूत प्रतिकारशक्तीच्या बळावर बरे होतात, पण दरम्यानच्या काळात अनेकांना त्याचा प्रसाद देऊ शकतात. त्यात मदतनीस महिला तर अनेक घरांमध्ये काम करतात, त्या अनेक इमारतींना इन्फेक्ट करू शकतात, हे बरोबरच आहे.

पण, मग याही प्रश्नाचा विचार करायला हवा की या महिलांना मज्जाव केल्याने किंवा एकंदरच घरकामगारांना मज्जाव केल्याने करोनाचा प्रसार थांबला आहे, असं काही घडलं आहे का? तसं अजिबातच घडलेलं नाही. त्याचा फैलाव वेगाने वाढतो आहे. टाळेबंदी असूनही वाढत होता, अनलाॅकमध्येही वाढत होता आणि आता पुन्हा अघोषित टाळेबंदी आली तरी तो वाढणारच आहे. कारण, बाहेरून कोणी आत आलं नाही, तरी आतून आपण बाहेर जातो आहोत, प्रवास करतो आहोत, बाजारात जात आहोत. गर्दीच्या ठिकाणी काळजी घेतली नाही किंवा कुठे किरकोळ गफलत झाली की करोनामहाराज आपल्या घरात दाखल झालेच म्हणून समजा. मग घरकामगारांच्या येण्याने महिलांची कामं हलकी होण्याची सोय किती आहे आणि इन्फेक्शनचा धोका किती आहे, याचा विचार केला पाहिजे.

आज ज्या ठिकाणी घरकामगार महिलांना प्रवेश आहे, तिथे त्यांना सोसायटीत प्रवेश करताना हात सॅनिटाइझ करावे लागतात. जिथे कामाला जातात तिथे घरात शिरताना त्यांच्यावर सॅनिटायझर फवारलं जातं. त्यांच्या तोंडावर मास्क असतो, घरातलेही मास्क लावून बसतात आणि त्यांच्यापासून शारीरिक अंतर राखतात. त्या गेल्यानंतर त्यांचा वावर होता किंवा हात लागला अशा वस्तू काही काळ तशाच ठेवणं आणि त्या वस्तू धुवून घेणं किंवा त्यांना हात लागला तर हात स्वच्छ धुवत राहणं हे करावंच लागतं. 

मधल्या काळात घरातल्या नादुरुस्त वस्तू, खासकरून इलेक्ट्रिकची कामं करायला, पावसाळ्यातली शाकारणी करायला कामगार आले होते, तेव्हा आपण काय केलं होतं? हेच तर केलं होतं. मग घरकामगारांच्या बाबतीत दुजाभाव का?

काही सोसायट्यांनी आणखी वेगळी सूचना केली आहे सदस्यांना. घरात मदतनीस महिला येणार असतील, तर त्यांची आरोग्यतपासणी झालेली असली पाहिजे आणि त्याचं प्रमाणपत्र त्यांनी आणलं पाहिजे. वरवर पाहता ही सूचना योग्यच आहे. पण ती फारच तात्कालिक नाही का? आरोग्य तपासणीत फक्त ताप आहे का आणि खोकला आहे का, हे पाहिलं जातं. करोनाची चाचणी होत नाही. प्रमाणपत्र घेतल्याच्या दिवशी यातलं काहीही होत नसलं तरी त्यानंतर त्या महिलेला तो त्रास होणारच नाही, असं कसं सांगणार? शिवाय ही बाह्यलक्षणं दिसत नसतानाही ती करोनाची सायलेंट कॅरियर असू शकतेच. त्यामुळे मानसिक समाधान आणि सोसायट्यांना जबाबदारी ढकलण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता, यापलीकडे काय साध्य होणार?

शिवाय आणखी एक प्रश्न आहेच. 

या महिलांना आपण वैद्यकीय तपासणी अनिवार्य करणार असू तर आपणही वैद्यकीय तपासणी करून घ्यायला हवीच आणि आपणही ते प्रमाणपत्र असल्याशिवाय घरकामगारांना घरात बोलावू नये… त्यांच्यापासून आपल्याला संसर्ग होण्याचा जेवढा धोका आहे, तेवढाच आपल्याकडून त्यांनाही होण्याचा धोका आहेच की.


हेही वाचा - डर के आगे अंडरटेकर था ..!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा