Advertisement

डर के आगे अंडरटेकर था ..!

जगाच्या या लाडक्या हिरोने गेल्या आठवड्यात निवृत्तीची घोषणा केली आणि कोरोनाच्या या काळात त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.

डर के आगे अंडरटेकर था ..!
SHARES

स्टेडियममधले सर्व दिवे विझले जातात. आता फक्त प्रवेशद्वाराजवळचा लाईट पेटतो. मग त्या लाईटमधून धुराची वलय बाहेर येतात. पाठोपाठ धीर गंभीर संगीत वाजू लागतं. सगळ्या प्रेक्षकांचे डोळे त्या प्रवेशद्वाराजवळ रोखले जातात. आणि एक मानवी आकृती त्या प्रवेशद्ववजवळ सावकाश येते. डोक्यावर भली मोठी काळी हॅट. अंगावर काळे कपडे. चेहरा अजिबात दिसत नाही. कसा दिसणार चेहऱ्यावर केसांची लांबलचक जुल्फे पुढे आलेली. काही सेकंद तो त्या दारापाशी उभा राहतो. WWE मधल्या या हिरोची एन्ट्री घाबरवून टाकणारी असते. या रहस्यमय व्यक्तीसोबत अजून एक मोठा झगा घातलेला गूढ माणूस असतो. त्याच्या हातात एक कलश असतो. या कलशात डेडमॅनच्या अस्थी असल्याची पूर्वी मोठी अफवा होती. धीर गंभीर वातावरणात मग हा काळ्या हॅटवाला सावकाश एक एक पाऊल टाकत रिंगकडे जात असतो. तमाम पब्लिकने आता ते स्टेडियम डोक्यावर घेतलेलं असतं. कुस्तीच्या त्या आखाड्यातील त्याचा स्पर्धक आता घाबरून रेफ्रीच्या मागे दडलेला असतो. त्याला कळलेलं असतं आता आपला काळ आलेला आहे. हा काळ म्हणजे काळ्या कपड्यातल्या हिरोचं नाव असत अंडरटेकर...! जगाच्या या लाडक्या होरोने गेल्या आठवड्यात निवृत्तीची घोषणा केली (wwe superstar the undertaker retire from wrestling) आणि कोरोनाच्या या काळात त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.

८० च्या दशकात WWE च्या फाइट्सनी जागाच लक्ष वेधून घेतलं होत. ९०च्या दशकात आपल्याकडे तर सगळे या फ्री स्टाईल कुस्ती पाहून अवाक झाले. त्यांना फक्त दारासिंग आणि त्याचा भाऊ रंधावा ठाऊक होते. पण या WWE कुस्त्यांची एकदम नवा फॉरमॅट आणला. एकमेकांवर काय उड्या काय मारायचे. त्यापण रिंगच्या दोरीवरून झेप घ्यायचे. एकमेकांवर खुर्च्या काय फेकायचे. त्यावेळी टीव्ही पाहणारे दचकून गांगरून आ वासून त्या फाइट्स पाहत बसायचे. आपल्याला ते सगळं नवं होत. वेगवेगळे मास्क लावलेले. वेगळ्या आक्राळविक्राळ नाव असलेले ते हिरो लवकरच लोकप्रिय झाले. मग आपल्याकडेही कुस्तीपटूंची पोस्टर्स बाजारात दिसू लागली. मुलांमध्ये या हिरोच्या कार्ड्सना मोठी मागणी आली. काही मुलांच्या दफ्तरांवर वह्यांवर यांचे स्टिकर दिसू लागले. यांच्या नावाचे व्हिडिओ गेम सुरु झाले. या सगळ्यात डेडमॅन अंडरटेकर अग्रेसर होता. लोक याचा चेहरा पाहायला धडपडू लागली. त्याचे डोळे कसे असतील याचा अंदाज करू लागली. कारण अंडरटेकरच सगळंच गूढ होत. त्यावेळच्या त्याच्या प्रसिद्ध बऱ्याच झालेल्या फोटोत त्याने डोळ्याची बुब्बुळे वर फिरवल्यामुळे फक्त पांढरे डोळे काहीवेळा दिसायचे. रिंगमध्ये असताना मारझोड करताना त्याच्या डोळ्याभोवती काळा रंग फासलेला असायचा त्यामुळे तिथेही तो गूढ अदृश्य वाटायचा .सहजीकच अंडरटेकरबद्दल अफवा खूप होत्या. लोक त्यात अजून मीठ मसाला घालून सांगत काळ्या कपड्यातला अंडरटेकरला  गडद करायचे.

२४ मार्च १९६५ रोजी जन्मलेल्या अंडरटेकरच खरं नाव मार्क विलियन कॅलवे. अमेरिकेतल्या टेक्सासमधल्या युनिव्हर्सिटीत त्याने स्पोर्ट मॅनेजमेंटमध्ये शिक्षण घेतलं. खरं तर त्याला फुटबाँलपटू व्हायचं होत. पण डोक्यात काय आलं नि तो कुस्तीकडे वळला. १९९० मध्ये अंडरटेकरने WWE शी करार केला. आणि रिंगणात  शांतपणे थंडपणे धुमाकूळ घालू लागला. आजपर्यंत तो १७२ सामने खेळाला आहे. त्याच्या नावावर ७ जागतिक जेतेपदं. सहा टॅग टीम चॅम्पियन्स जेतेपदं आहेत.पाठोपाठ त्याने २००७ मध्ये रॉयल रंम्बल पुरस्कार मिळवला. १२ वेळा स्लॅमी पुरस्कार जिंकला आहे. सलग २१ वेळा Wrestlemania सामने जिंकले आहेत. पुढं मात्र त्याला ब्रॉक लेसनरनं ब्रेक लावला. त्यानंतर ५ Wrestlemania सामन्यांत अंडरटेकरने  भाग घेतला. पण, त्याला रोमन रैगन्सकडून हार मानावी लागली. २०१८ च्या Wrestlemania सामन्यात त्यानं अवघ्या तीन मिनिटांत जॉन सीनाला चीतपट केलं. ही त्याची शेवटची मोठी कामगिरी.

अंडरटेकर सध्या टेक्सासच्या ऑस्टिनमध्ये आलिशान घरात राहतो. हे घर त्याने आपल्याला हवं तास मोठ्या मुश्किलीने बनवून घेतलंय. घरात त्याने सरावासाठी रेसलिंग रिंग तयार करून घेतलीय. हॉलिवूडचा प्रसिद्ध स्टार ब्रॅड पिट एकदा या भागात शूटिंगला आला होता. त्याला हे अंडरटेकरच घर खूप आवडलं होतं. काही दिवस तो आणि त्याची पत्नी अँजोलिना या आलिशान घरात भाड्याने राहत होती. अंडरटेकरला मोटारसायकलचं वेड आहे. महागड्या मोटारसायकली त्याच्या संग्रही आहेत. यात हर्ले डेव्हिडसन, वेस्ट कॉस्ट चॉपर्स मोटारसायकली आहेत. रिंगणात मारामारी करणाऱ्या अंडरटेकरची ३ लग्न झाली आहेत. अंडरटेकरची जगात बरेचजण नक्कल करतात. अलिकडे लग्नात वेगवेगळे फॅड  येताहेत. पाकिस्तानात एका नवरदेवाने लग्नात चक्क अंडरटेकरांचा वेष परिधान करून एन्ट्री केली होती. अंडरटेकरला आता निवृत्त झाल्याबद्दल जगात त्याचे खूप फॅन मनोरंजन केल्याबद्दल धन्यवाद देताहेत. रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सनेदेखील त्याच्यासाठी खास ट्विट करत त्याला #ThankYouTaker म्हटलं आहे. असो. असा हा सगळ्यांचा आवडता हिरो आपल्या आता रिंगणात दिसणार नाही. पण  त्याची हॅट आठवेल. त्याचे लांब केस आठवत राहतील. त्याचा पेहराव आठवत राहील. थोडक्यात अंडरटेकर कायमच आठवत राहील.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा