Advertisement

कोरोना चालेल, राजकारण नको!

पडळकरांसारख्या नेत्याचं नको त्या वेळी नको ते वक्तव्य, त्यानंतर फडणवीसांचा उशिराने झालेला खुलासा आणि इतर नेत्यांकडून पडळकरांबाबत दाखवलेली सहानुभूती हे सर्व लक्षात घेता फडणवीसांनी पवारांशी पंगा घेण्यापूर्वी आधी स्वपक्षातल्या नेत्यांना सांभाळावं, हेच बरं…

कोरोना चालेल, राजकारण नको!
SHARES

काही दिवसांपूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सध्या कुठेच संधी नसलेले पण सोशल मीडियामुळे येनकेन प्रकारेण चर्चेत राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका ज्येष्ठ पत्रकाराला मुलाखत देऊन नव्याने पण जुनाच गौप्यस्फोट घडवण्याचा एक प्रयत्न केला. त्यांच्या मुलाखतीनंतर उद्धव ठाकरे सरकार अस्तित्वात येण्यापूर्वी झालेल्या राजकारणाचा विशेषतः अजित पवार यांच्याबरोबर 'रात्रीस खेळ चाले' म्हणत झालेल्या एक दिवसीय सरकारचा 'ऑन द रेकॉर्ड' खुलासा देवेनभाऊंनी केला. म्हणजे, विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीसांनी अधिकृतरीत्या शरद पवार आणि अजित पवार यांच्या भूमिका समोर आणत पवार घराण्यालाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.

खरंतर, या गौप्यस्फोटानंतर दोन्ही पवारांकडे तमाम प्रसारमाध्यमांनी धाव घेऊन त्यांची बाजू जाणून घ्यायचा प्रयत्न करायला हवा होता. तसं झालंही असतं कदाचित…पण, त्यापूर्वीच भाजपाचेच एक पडेल (बारामतीत विधानसभा निवडणुकीत डिपॉझिट गेलेले) नेते गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना, असा उल्लेख करत हलकल्लोळ उडवला.

अर्थात, पवारसाहेबांवर खालच्या पातळीवरील टीका ही काही पहिल्यांदा झालेली नाही. पण पवारसाहेबांनी अशा टीकाकारांना आजवर कधीच उत्तर दिलेलं नाही. अगदी बाळासाहेबांनी मैद्याचं पोतं, म्हमद्या वगैरे उपमा दिल्या तरी पवारसाहेब नेहमी शांत राहिले आणि कार्यकर्त्यांनाही शांत ठेवलं. पण, यावेळी मात्र ही गणितं बदललेली दिसली.

मग याचवेळी असं काय झालं की, पवारसाहेबांना पडळकरसारख्या पडेल उमेदवाराची टीका इतकी टोचावी? अगदी दोन दिवस इडियट बॉक्सचा पडदा व्यापेल एवढी आंदोलनं राज्यभरात झाली? कधीही दखल न घेण्यासारख्या या नेत्याला राष्ट्रवादी काँग्रेसनं इतका मोठा केला की सर्व मराठी वृत्तवाहिन्यांवर पवारांच्या बाजूला पडळकरांचे फोटो झळकले. जणू, पवारांच्या तोडीस तोड नेताच निर्माण झाला की काय, अशी शंका यावी.

याचा राजकीय अन्वयार्थ काढायचा झाल्यास, फडणवीसांनी उकरून घडवलेला रात्रीच्या खेळातील गौप्यस्फोट डिफ्यूज करावयास पडळकरांचं वक्तव्य पवारांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने वापरलं, असाच घेता येईल. वाहिन्यांना दोन दिवस अॅक्शन व्हिज्युअल्स पुरवत २४ तासांचा प्रश्न पण सोडवला आणि प्रतिक्रिया देण्यापासून काका-पुतण्यांनी स्वतःचा बचावही केला. 

गंमत म्हणजे फडणवीसांच्या या तथाकथित गौप्यस्फोटानंतरच्या दुसऱ्याच दिवशी सकाळ-सकाळ्ळ अजितदादा सिल्व्हर ओकवर पोहोचल्याची बातमी काही वृत्तवाहिन्यांनी ब्रेकिंग न्यूजच्या पट्टीत दाखवलीही होती. पण, नंतर त्या बातमीचं काय झालं हे गुलदस्त्यात राहिलं.

फडणवीसांना अजून बरंच शिकायचंय…

या सर्व राजकीय घटनाक्रमाचा विचार करता, फडणवीसांना अजून पवार समजायला वेळ लागेल, असंच म्हणता येईल. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे अस्वस्थ झालेत अशी टीका होतच असते. त्यातूनच त्यांच्याकडून होणारी तीन पायांच्या सरकारवरची टीकाही अनेकदा त्यांनाच अडचणीत आणणारी ठरतेय. सुरुवातीला उद्धव ठाकरेंवर केलेली घाईघाईतली, अनाठायी टीका आता विरोधी पक्षनेतेपदावरून केलेल्या अनेक कामांचे महत्त्व कमी करणारी ठरतेय. भाजपाला सत्ता गेल्याचं दुःख पचवता येत नाहीय, हा समज करून देण्यात पवारांचं राजकारण यशस्वी ठरल्यानेच फडणवीसांना वेळोवेळी तोंडावर पडल्यासारखं होतंय, हेही जाणवतंय.

फडणवीसांनी खरंतर आपल्या राजकारणाचा नीट विचार आधीच करायला हवा होता. पण, अजूनही वेळ गेलेली नाही. शरद पवार हे राज्याच्या राजकारणात तेल लावलेले पैलवान आहेत, असं अनेकदा म्हटलं जातं. हे सर्व लक्षात घेऊनच फडणवीसांनी आखाड्यात उतरायला हवं होतं. त्यामुळेच, यावेळीही त्यांच्या पकडीतून ते सहज सुटले असं म्हणता येईल.

परंतु, यामुळे फडणवीसांच्या राजकीय डावपेचांना त्यांच्याच पक्षातून सहकार्य मिळत नाही असंही चित्र निर्माण होतंय. पडळकरांसारख्या नेत्याचं नको त्या वेळी नको ते वक्तव्य, त्यानंतर फडणवीसांचा उशिराने झालेला खुलासा आणि इतर नेत्यांकडून पडळकरांबाबत दाखवलेली सहानुभूती हे सर्व लक्षात घेता फडणवीसांनी पवारांशी पंगा घेण्यापूर्वी आधी स्वपक्षातल्या नेत्यांना सांभाळावं, हेच बरं…

कोरोनाच्या संकटकाळात खरंतर विरोधी पक्षांनी सुरुवातीपासून ठाकरे सरकारला सहकार्य करणं अपेक्षित होतं. पण, तसं न होता पहिल्यांदा अलिप्त राहून मजा बघण्याची भूमिका विरोधकांनी घेतली. त्यानंतर सहकार्य करतो सांगत अनेकदा अडचणीत आणण्याची खेळी खेळल्याचंच चित्र सरकारकडूनच रंगवलं आणि ते लोकांना पटू लागलं. पण नंतर कोरोनाचं संकट गहिरं झालं आणि सरकारी अपयश प्रकर्षाने जाणवू लागलं, तेव्हा विरोधी पक्ष सक्रिय झाले. पण, तोपर्यंत विरोधकांनीही स्वतःची विश्वासार्हता कमी करून ठेवली होती. त्यामुळे, आता कोरोनाकाळात दोन्ही बाजूंनी झालेल्या राजकारणाचं बूमरँग होताना दिसतंय.

कधी उद्धव ठाकरे सरकारबाबत सहानुभूती निर्माण करण्यात सरकारी पीआर, सोशल मीडिया यशस्वी ठरतो तर कधी विरोधकांची सरशी होताना दिसते… थोडक्यात सांगायचं तर महाराष्ट्रासारख्या राज्यात पवारसाहेबांसारखे अनुभवी, संकटमोचक, जाणते म्हणून कौतुक केलं जाणारं नेतृत्त्व असतानाही संकटनिवारण होताना दिसत नाहीय. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आता 'कोरोना चालेल, पण राजकारण नको', असं म्हणायची वेळ आलीय.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा