हार्बर मार्गावरील पनवेल (panvel) रेल्वे स्थानकावर गर्दी वाढली असून प्रवाशांना अनेक वेळा चेंगराचेंगरीसारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.
मध्य रेल्वेवर (central railway) सध्या 94 एसी लोकल (AC local) फेऱ्या धावतात. यापैकी 14 फेऱ्या दोन महिन्यांपूर्वी हार्बर मार्गावर सुरू करण्यात आला होता.
नियमित वेळापत्रकामध्येच सामान्य लोकलऐवजी एसी फेऱ्या सुरू केल्या. यामुळे सकाळी, दुपारी आणि सायंकाळी 14 सामान्य लोकल फेऱ्यांचं रुपांतर एसी लोकलमध्ये झालं.
याचा परिणाम सामान्य लोकल फेऱ्यांवर झाल्यामुळे वेळापत्रक कोलमडलं आणि प्रवाशांची स्थानकावर गर्दी वाढू लागली आहे. प्रवाशांनी 'मुंबई मिरर'सोबत बोलताना एसी लोकल नेहमी विलंबाने धावत असल्याची माहिती दिली.
सकाळी 9.09 ला पनवेल स्थानकावरून सुटणारी लोकल (mumbai local) बहुतेकदा सकाळी 9.26 वाजता सुटते. यामुळे त्यामागच्या 9.17, 9.28 आणि 9.32 या सामान्य लोकलही विलंबाने सुटतात.
वातानुकूलित लोकलमध्ये प्रवास करणाऱ्यांपेक्षा विनावातानुकूलित प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे दररोज प्रवासी ताटकळत राहतात. सामान्य लोकल येईपर्यंत या गाड्या भरलेल्या असतात.
पनवेल रेल्वे स्थानकावर यापूर्वीच प्रवाशांची संख्या मोठी होती. हार्बर मार्गावरील प्रवाशांसह पेण व रोह्यावरून येणाऱ्या प्रवासी ही याच स्थानकावर उतरतात.
तसेच, प्लॅटफॉर्मवरून नवीन पनवेलकडे पोहोचण्यासाठी तब्बल 70 पायऱ्यांचा जिना चढावा लागतो. जेव्हा दोन्ही मार्गावरील प्रवासी एकत्र स्थानकावर दाखल होतात तेव्हा या जिन्यांवर चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण होते.
दरम्यान, सीएसएमटी ते पनवेलचे अंतर 49 किमी असून एसी लोकलचा मासिक पास 2225 रुपयांचा असतो. तेच, सीएसएमटी ते डोंबिवलीपर्यंतचे अंतरही समान असून एसी लोकलच्या मासिक पास 2050 रुपये आहे.
दरम्यान, हार्बर मार्गावरील सामान्य मासिक पाससुद्धा 370 रुपये असून तोच सीएसएमटी ते डोंबिवली 300 रुपये आहे. त्यामुळे नागरिकांनी या दरांवरती ही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
