सीएसएमटी पूल दुर्घटना : महापालिका, रेल्वे अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

सीएसएमटी पूल दुर्घटने प्रकरणी पोलिसांनी रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SHARE

मुंबई महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेला आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजता कोसळला. या दुर्घटनेत ६ जण मृत्युमुखी पडले तर ३१ जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तसंच याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.


उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

यापूर्वी झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं होतं. या ऑडिनुसार हिमालय पूल मजबूत स्थितीत असल्याचं सांगण्यात आलं होतं. तसंच, त्यामध्ये किरकोळ दुरुस्तीची कामं सुचविण्यात आली होती. मात्र, गुरुवारी घडलेल्या या दुर्घटनेनंतर या स्ट्रक्चरल ऑडिट प्रक्रियेची चौकशी करण्यात येणार आहे. स्ट्रक्चरल ऑडिट व दुरुस्ती कामांमध्ये निष्काळजी केल्याचं आढळल्यास त्यातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून ही संपूर्ण चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.


५ लाखांची मदत

या दुर्घटनेतील जखमींवर पूर्ण उपचार करण्यात येणार आहेत. तसंच, या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये देण्यात येतील. तर, जखमींना ५० हजार रुपयांची मदत करण्यात येईल, असंही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितलं.


पुलाची जबाबदारी कोणाची?

दरम्यान, या पादचारी पुलावरुन रेल्वे आणि महापालिका प्रशासन यांच्यामध्ये या पुलाची जबाबदारी नेमकी कोणाची यावरुन टोलवाटोलवी सुरु होती.  रेल्वे स्थानकाच्या हद्दीतील पूल हा रेल्वे प्रशासनाच्या अंतर्गत, तर टर्मिनसला जोडणारा पूल महापालिकेच्या अंतर्गत येतो, असं रेल्वे प्रशासनाचे म्हणणं होतं. मात्र, हा संपूर्ण पूल रेल्वेच्या हद्दीत असल्याचे महापालिकेचं म्हणणं होतं. परंतु, अखेर महापालिकेनं हा पूल पालिकेचाच असल्याचं कबुल केलं.


महापालिकेची कबुली

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पुलाची जबाबदारी रेल्वेची असल्याचं सांगितल्यानं लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, त्यानंतर रेल्वे प्रशासनानं हा पूल महापालिकेच्या अख्त्यारित येत असून आम्ही सहकार्य करत असल्याचं सांगितलं. त्यानंतर, महापालिका अधिकाऱ्यांना रात्री उशीरा या पुलाची जबाबदारी महापालिकेची होती हे स्पष्ट केल्याने संभ्रम दूर झाला.

या दुर्घटनेत अपूर्वा प्रभू (३५), रंजना तांबे (४०), सारिका कुलकर्णी (३५), तपेंद्र सिंग (३५), जाहीद सिराज खान (३२) आणि मोहन कायगडे (५५) या सहा जणांचा मृत्यू झाला. तर, सोनाली नवले (३०), अद्वित नवले (३), राजेंद्र नवले (३३), राजेश लोखंडे (३९), तुकाराम येडगे (३१), जयेश अवलानी (४६), महेश शेरे, अजय पंडित (३१), हर्षदा वाघले (३५), विजय भागवत (४२), निलेश पाटवकर, परशुराम पवार, मुंबलिक जयस्वाल, मोहन मोजडा (४३), आयुशी रांका (३०), सिराज खान (५५), राम कुपरेजा (५९), राजेदास दास (२३), सुनील गिरलोटकर (३९), अनिकेत अनिल जाधव (१९), अभिजीत मान (२१), राजकुमार चावला (४९), सुभेष बॅनर्जी (३७), रवी लागेशेट्टी (४०), नंदा विठ्ठल कदम (५६), राकेश मिश्रा (४०), अत्तार खान (४५), सुजय माझी (२८), कनुबाई सोलंकी (४७), दीपक पारिख हे जखमी झाले आहेत.


सनदशीर मार्ग समजत नाही हे दुर्दैव

सीएसएमटी पादचारी पूल कोसळल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका आणि रेल्वे मंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ही घटना दुर्दैवी आहे आणि मनसे अपघातग्रस्तांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या दु:खात सहभागी आहे. नेहमीप्रमाणे रेल्वेमंत्री ट्विटरवरुन चौकशीचे आदेश कसे दिले, याची टिमकी वाजवतील, जबाबदारी झटकतील आणि मुंबईकर भरडले जात राहतील, मनसेनं सनदशीर मार्गानं संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा केला, पण सनदशीर मार्ग त्यांना समजत नाही हे दुर्दैव आहे, असे राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
हेही वाचा -

मान्सूनपूर्व तयारीबाबत न्यायालयाकडून महापालिकेची कानउघडणी

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; माढा, नगरबाबत सस्पेंस कायमसंबंधित विषय
ताज्या बातम्या