Advertisement

पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळं 'या' आजाराचा धोका; पालिकेचं काळजी घेण्याचं आवाहन

मुंबईत जास्तीचा पाऊस झाल्यास अनेक सखल भागात गुडघाभर पाणी साचतं. यामुळं अनेक साथीच्या आजारांचा धोका निर्माण होतो.

पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळं 'या' आजाराचा धोका; पालिकेचं काळजी घेण्याचं आवाहन
SHARES

मुंबईत जास्तीचा पाऊस झाल्यास अनेक सखल भागात गुडघाभर पाणी साचतं. यामुळं अनेक साथीच्या आजारांचा धोका निर्माण होतो. विषेश म्हणजे, पावसामुळं ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यातून चाललेल्या व्यक्तींना लेप्टोस्पायरोसिस होण्याचा धोका असून या व्यक्तींनी २४ ते ७२ तासांच्या आत वैद्यकीय सल्ल्याने प्रतिबंधात्मक उपचार घ्यावेत असं आवाहन महापालिकेनं केलं आहे. दरम्यान सध्या कोरोनानं मुंबईकर हैराण झाले आहेत.

पावसात साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यातून नागरिकांना चालावं लागतं. याच पाण्यात उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी इत्यादी प्राण्यांच्या लघवीद्वारे (मूत्रातून) लेप्टोचे सूक्ष्मजंतू पावसाच्या पाण्यात मिसळतात. अशा बाधित झालेल्या पाण्याशी माणसाचा संपर्क आल्यास त्याला लेप्टोची बाधा होण्याची शक्यता असते.

व्यक्तीच्या पायाला किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला जखम असेल, अथवा साधे खरचटलेले जरी असेल; तरी अशा छोट्याश्या जखमेतूनसुद्धा लेप्टोचे जंतू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळं ज्या व्यक्तींचा साचलेल्या पावसाच्या पाण्याशी संपर्क आला असेल, त्यांनी तातडीनं वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक औषधोपचार घेणे गरजेचं आहे.

कमी जोखीम

ज्या व्यक्ती पावसाच्या साचलेल्या पाण्यातून एकदाच चालल्या असून ज्यांच्या पायावर किंवा पाण्याशी संबंध आलेल्या शरीराच्या भागावर जखम नसेल अशा व्यक्ती लेप्टोच्या अनुषंगाने कमी जोखीम या गटात मोडतात. अशा व्यक्तींना डॉक्टरांनी ‘डॉक्सिसायक्लीन’ (२०० मिलीग्रॅम) या कॅप्सूलचे एकदा सेवन करण्यास सांगावं.

मध्यम जोखीम 

पायावर किंवा शरीरावर जखम असतानाही साचलेल्या पाण्यातून चाललेल्या व्यक्ती व्यक्ती लेप्टोच्या अनुषंगाने मध्यम जोखीम या गटात मोडतात. या व्यक्तींना तपासणी करून डॉक्टरांनी ‘डॉक्सिसायक्लीन’ (२०० मिलिग्रॅम) या कॅप्सूलचे दररोज एक वेळा याप्रमाणे सलग तीन दिवसांसाठी द्यावी. 

अतिजोखीम

पावसाच्या साचलेल्या पाण्यातून एकापेक्षा अधिक वेळा चाललेल्या किंवा ज्यांनी साचलेल्या पाण्यात काम केले आहे अशा व्यक्ती लेप्टोच्या अनुषंगाने अतिजोखीम या गटात मोडतात. या व्यक्तींना तपासणी करून डॉक्टरांनी ‘डॉक्सिसायक्लीन’ (२०० मिलिग्रॅम) या कॅप्सूलचे आठवड्यातून एक वेळा याप्रमाणे सलग ६ आठवड्यांसाठी द्यावेत. प्रतिबंधात्मक औषधोपचार हे केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करणे गरजेचे आहे, अशा सूचना पालिकेने दिल्या आहेत.हेही वाचा -

आता घरीच करा कोरोना चाचणी; वाचा कशी करायची?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा चालकांना आर्थिक मदत


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा