
बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST Undertaking) मधील निवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत बसप्रवास देण्याची मागणी प्रशासनाने अखेर नाकारली आहे. आर्थिक अडचणींचा दाखला देत ही सवलत देणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ही मागणी प्रथम 2018 मध्ये एका माजी नगरसेवकांनी मांडली होती. निवृत्तीनंतर (superannuation) कर्मचाऱ्यांना आयुष्यभर मोफत प्रवासाचा लाभ द्यावा, अशी या प्रस्तावाची मागणी होती. मात्र, अनेक वर्षांच्या चर्चेनंतर BEST प्रशासनाने हा प्रस्ताव अमलात आणणे शक्य नसल्याचे सांगितले आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, BEST आधीच गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत अतिरिक्त मोफत प्रवासाची सुविधा दिल्यास आर्थिक भार आणखी वाढेल.
सध्या काही विशिष्ट घटकांना मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते. यात नगरसेवक, दिव्यांग व्यक्ती, पोलीस कर्मचारी, स्वातंत्र्यसैनिक आणि महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास दिले जातात.
पूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर एका वर्षासाठी मोफत प्रवासाची सुविधा होती. मात्र वाढत्या तोट्यामुळे ही सुविधा बंद करण्यात आली. सध्या निवृत्त कर्मचाऱ्यांना दरवर्षी सुमारे 900 रुपयांत बस पास दिला जातो.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सरकारकडून आर्थिक मदत किंवा अनुदान मिळाल्याशिवाय अशा अतिरिक्त सवलती देणे शक्य नाही.
हेही वाचा
