Advertisement

बेजबाबदार वाहनचालकांना आवरणार कोण?

मुंबईत वाहतूककोंडी होऊ नये यासाठी मागील अनेक वर्षांपूर्वी 'आॅटोमॅटीक सिग्नल यंत्रणा' कार्यन्वित करण्यात आली. पण सध्यस्थितीत मुंबईतील वाहन चालक जागोजागी सिग्नल तोडत नियमांचं उल्लंघन करताना दिसतात.

बेजबाबदार वाहनचालकांना आवरणार कोण?
SHARES

दरदिवशी मुंबईकरांना वाहतुकीच्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. यामधील सर्वात मोठी समस्या म्हणजे 'वाहतूककोंडी’. मुंबईत सार्वजनिक आणि खासगी वाहनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळं मुंबईतील महत्वाच्या रस्त्यांवर आणि गल्लोगल्ली वाहतूककोंडी निर्माण होतं आहे. मात्र, एकदा का ही वाहतूककोंडी निर्माण झाली की, तासंतास प्रवाशांना या कोंडीत अडकून राहावं लागतं. त्यावेळी वाहन चालक उपस्थित वाहतूक पोलिसांना शिव्या घालतात. परंतु, या वाहतूककोंडीचं मुख्य कारण म्हणजे वाहतूकीचे नियम न पाळणं. मुंबईत वाहतूककोंडी होऊ नये यासाठी मागील अनेक वर्षांपूर्वी 'आॅटोमॅटीक सिग्नल यंत्रणा' कार्यन्वित करण्यात आली. पण सध्यस्थितीत मुंबईतील वाहन चालक जागोजागी सिग्नल तोडत नियमांचं उल्लंघन करताना दिसतात.

मुंबईत बेशिस्त वाहन चालकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हे बेशिस्त वाहन चालक वाहतूक पोलीस असतील तरच, वाहनं सिग्नलवर उभी करतात. मात्र इतर ठिकाणी सिग्नलचे नियम धाब्यावर बसवताना दिसतात. त्यामुळे वाहतूककोंडी व अपघातांच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. मुंबईतील वाहतुकीला शिस्त लागावी, वाहतूककोंडी व अपघात होऊ नये यासाठी आवश्यक त्या ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले आहेत. परंतु, वाहनचालक सिग्नलचे नियम बिनधास्तपणे तोडत असल्याने ही सिग्नल यंत्रणा शोभेची झाली आहे.

अनेक महत्वाच्या ठिकाणी सिग्नल सुरू असतानाही वाहनं वेगानं जात असल्याचं निदर्शनास येतं. त्यामुळं पादचारी आणि वाहन चालकांमध्ये वाद झडतात हे वाद हाणामारीपर्यंत जातात. यासाठी नेहमीच वाहतूक पोलिसांना जबाबदार धरलं जातं. मात्र प्रत्यक्षात या सर्व परिस्थितीला वाहतुकीचे नियम तोडणारे बेशिस्त वाहन चालक जबाबदार असतात. वाहतुकीचे नियम जसे वाहन चालकांसाठी असतात तसेच काही नियम पादचाऱ्यांसाठी देखील असतात. मात्र कुठलंही तारतम्य न बाळगता पादचारी झेब्रा क्रॉसिंग असो किंवा नसो बिनधास्त रस्ता ओलांडताना दिसतात. रस्त्यावर वाहनांची कितीही वर्दळ असो या पादचाऱ्यांना स्वस्त:च्या जीवाची काहीही पर्वा नसते. उलट रस्त्याच्या मध्ये घुसखोरी करून ते वाहनचालकाच्या जीवालाही धोका निर्माण करतात. 

एका मार्गावर वाहतूक पोलिस उभे असल्यास वाहनचालक सिग्नल तोडत दुसऱ्या मार्गाचा वापर करतात. अशावेळी वाहनचालकांनी वाहतुकीच्या शिस्तीच्या नियमांचं पालन काटेकोरपणे करावं यासाठी नियम मोडणाऱ्यांना दंड आणि शिक्षेची कारवाई केली जाते. मात्र, या कारवाईचं गांभीर्य वाटत नसल्यामुळं सिग्नल तोडून पळून जाणाऱ्या वाहन चालकांच्या संख्येत सातत्यानं वाढ होतं आहे.

या बेशिस्त चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मुंबईत ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. बहुसंख्य चौकात सीसीटीव्ही लावल्याचं माहीत असूनही दुचाकीस्वारांना त्याची पर्वा नसल्याचं दिसून येतं. मात्र, या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे सिग्नल तोडणाऱ्या चालकाच्या गाडीचा नंबर कैद करून त्याला इ चलन पाठवलं जातं. मोबाइलवर बोलत वाहन चालविणं, सिग्नल तोडणं, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभं करणं, एकेरी मार्ग असतानाही विरोधी दिशेनं वाहन चालविणं, फॅन्सी नंबरप्लेट अशा नियमबाह्य वाहनधारकांच्या संबंधित दुचाकी, कारचा फोटो वाहतूक पोलिस मशीनद्वारे टिपतात आणि त्यांना पुरव्यासहीत दंड आकारतात.

वाहनचालकानं केलेल्या गुन्ह्याचं कलम टाकताच दंडाची रक्कम स्क्रीनवर दिसते. ही रक्कम वाहनधारकाकडून एटीएम, डेबिट कार्ड वापरून आॅनलाईनद्वारे भरून घेतली जाते. यामुळे काही प्रमाणात वाहनचालकांमध्ये धास्ती निर्माण झालेली असली, तरी पुरेशी नाही.  

मुंबईतील अनेक रस्त्यांवर  सिग्नल बंद असतात. अशा ठिकाणी अतिरिक्त वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आलेली असते. मात्र, बेशिस्त वाहनचालकांच्या मागे लागून लागून त्यांचीही मुरकुंडी वळते. काही पोलिस तर कमाई करण्याच्या नादात सिग्नलवर न थांबता सिग्नलच्या पुढे दबा धरून बसलेले असतात. त्यातच एखाद्या चालकानं सिग्नल तोडला की त्याच्याकडून जबर वसुली करतात. त्याऐवजी पोलिसांनी सिग्नलवर थांबल्यास वाहनचालकांच्या बेशिस्तपणाला आळा घालता येईल. 

मुंबईतील वाहनचालक असो, पादचारी असो किंवा वाहतूक पोलिस, चुका सर्वांकडूनच होतात हे मान्य केलं तरी खरी गरज आहे ती बेर्पवाई खपवून घेण्याच्या मानसिकतेत बदल करण्याची.

 


हेही वाचा -

रेल्वे तिकीट आरक्षण करणं महाग, २० ते ४० रुपये सेवाशुल्क लागणार

आता बेस्टही करणार टिव टिव..!संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा