Advertisement

जागर महिलाशक्तीचा : वडिलांच्या प्रेरणेतून घेतला स्वच्छतेचा ध्यास


जागर महिलाशक्तीचा : वडिलांच्या प्रेरणेतून घेतला स्वच्छतेचा ध्यास
SHARES

आधी गणेशोत्सव आणि आता नवरात्रीदरम्यान मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे मुंबईची तुंबई होत गेली. त्यामुळे वाहतूक आणि जनजीवन दोन्हीही विस्कळीत झाले.

खरेतर शहरात पाणी साचण्याचे मुख्य कारण म्हणजे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर. मुंबई महापालिकेने अनेकदा सूचना दिल्यानंतरही मुंबईचे नागरिक मात्र प्लॅस्टिक पिशव्या वापरणे बंद करत नाहीत. अनेकांना तर कापडी पिशव्यांचा वापर करणे लजास्पद वाटते. त्यामुळे जोरदार पाऊस झाला तर मुंबईकर पाण्यात बुडतील की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

त्यामुळे मुंबईकरांनो कचरा करू नका, प्लॅस्टिकचा वापर टाळा यामुळे प्रदूषण होईल तुम्हाला आणि इतरांना याचा भविष्यात प्रचंड त्रास सहन करावा लागेल, असे वारंवार एक व्यक्ती मुंबई शहरात रहात असताना सर्वांना सांगायचे.

2009 साली या व्यक्तीने म्हणजे महापालिका जी उत्तर विभागाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक मुख्य पर्यवेक्षक तानाजी घाग यांनी आपले घर, इमारतीचा माळा आणि घराच्या आजूबाजूचा परिसर स्वतः झाडून साफ करायला सुरुवात केली. मूळातच महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात ते कार्यरत असल्यामुळे त्यांना परिसर स्वच्छ करताना काहीही गैर वाटत नव्हते. विभाग शहर आणि देश स्वच्छ असायला हवा हे एकच ध्येय त्यांच्या समोर होते. घाग यांच्या या प्रयत्नाला साथ दिली ती त्यांच्या पत्नी आणि मुलीने. विभागातील लोक त्यांचे स्वच्छतेचे काम बघून त्यांना हिणवू लागले.


कोमलने वडिलांना दिली साथ

वडिलांचे काम बघून हे काम मुंबईभर पसरवण्यासाठी पुढे आली ती त्यांची मुलगी कोमल. कोमलने वयाच्या 15 व्या वर्षी 2009 साली वडिलांबरोबर या स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली. 2009 ते 2012 या काळात स्थानिक पातळीवर काम केल्यानंतर या कामाचा पसारा वाढवण्याचा विचार कोमलने केला. 2012 साली 'संगम' या सामजिक संस्थेची स्थापना केली. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी कोमलने संस्था स्थापन केल्यानंतर स्वयंसेवक आणि कर्मचारी अशी फक्त 20-25 जणांची टीम होती. सध्या ही टीम 4 पट वाढली आहे. लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती होत गेली, तसे संस्थेचे सदस्य वाढत गेले. पूर्वी स्वच्छता करताना हसणारे लोक भुवया उंचावून संगम प्रतिष्ठानची कामे पाहू लागले.

वडिलांच्या प्रेरणेतून कोमलने संगम प्रतिष्ठानमधून गेल्या 8-9 वर्षाच्या काळात अनेक स्वच्छतादूत घडवले. अशा प्रकारे स्वच्छता करणारे अनेक जण आहेत. पण नावारुपास आले नसले तरी ते त्यांच्या पातळीवर योग्यपणे स्वतःची जबाबदारी पार पाडत असल्याचे कोमल सांगते. 


त्यांपैकी या संस्थेत घडलेले आणि सर्वांना सुपरिचित असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे दादरचा स्वच्छता दूत म्हणून ओळखला जाणारा जय शृंगारपुरे. या गणेशोत्सवात कोमलने संगम प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम देखील राबवली. ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून त्याद्वारे जनजागृती करण्याचे काम सध्या कोमल करत आहे.

उत्तम शिक्षण घेतल्यानंतर प्रत्येकाला गडगंज पगाराची नोकरी असावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते परंतु, रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सध्या निर्मला निकेतनमधून एम. एस. डब्ल्यूचे शिक्षण घेणारी कोमल निरपेक्ष भावनेने शहराची स्वच्छता करत आहे.

कोमलला डान्स आणि फोटोग्राफीचे छंद आहे. संस्थेच्या कामातून मिळालेल्या वेळेत कोमल अभ्यासासोबत फोटोग्राफीचा छंद देखील जोपासत आहे.

थेट मुंबईची स्वच्छता करा, असे मी म्हणत नाही, परंतु प्रत्येकाने स्वच्छतेबाबत काही नियम पाळले आणि स्वतःपासून सुरुवात केली, तर नक्कीच मुंबईची तुंबई होणार नाही. 23 वर्षांची कोमल आणि स्वच्छतेसाठी तिची सुरू असलेली धडपड मुंबईकरांना नक्कीच प्रेरणा देणारी आहे.
- कोमल घाग

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा