Advertisement

फ्लोरा फाऊंटनचा परिसर पर्यटकांना भुरळ पाडणार


फ्लोरा फाऊंटनचा परिसर पर्यटकांना भुरळ पाडणार
SHARES

मुंबईतील फ्लोरा फाऊंटनमधील शिल्प आणि कारंज्यांची डागडुजी करून त्यांना मूळ स्वरुप दिले जात असतानाच आता या संपूर्ण परिसराचंही सुशोभिकरण करण्यात येणार आहे. यासर्व परिसरात बसण्यासाठी आकर्षक आसने आणि विशिष्ट प्रकारच्या लाद्या बसवून या परिसराच्या सौंदर्यात भर पाडली जाणार आहे.


फ्लोरा फाऊंटनचा इतिहास

मुंबई हुतात्मा चौकाजवळ असलेले फ्लोरा फाऊंटन ही वास्तू आणि कारंजे हे श्रेणी १मध्ये मोडत आहे. पोर्टलँड दगडपासून ही फ्लोरा फाऊंटनची वास्तू १८६४ साली उभारण्यात आली आहे. या कारंजाच्या वास्तूच्यावरील बाजुस रोमन देवता असून कारंजाच्या चारही बाजूला भारतातील उद्योगधंदे, धान्य, झाडे, फळे यांची प्रतिकृतीसह युवतींचे पुतळे आहे. हे कारंजे तीन टप्प्यांमध्ये पडण्याची व्यवस्था आहे.


कारंजाच्या वास्तुला मूळ स्वरुप मिळणार

कारंज्याच्या वास्तुंची डागडुजी करण्याची जबाबदारी इंटक यांच्यावर सोपवली आहे. हे काम योग्यप्रकारे व्हावे म्हणून पुरातन वास्तू विशारद विकास दिलावली यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे याचे काम येत्या ३० जून २०१८ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. यामध्ये युवतींचे तुटलेले हात जोडून तसेच कारंजे तीन टप्प्यात सुरू करून या कारंजाच्या वास्तुला मूळ स्वरुप देण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं महापालिका पुरातन विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सावंत यांनी सांगितलं.


आसपासच्या परिसराचंही सुशोभिकरण

कारंजाच्या या वास्तूबरोबरच आसपासच्या परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठीचे कामही हाती घेतलं आहे. यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली असून याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. या सुशोभिकरणामध्ये फ्लोरिंगसह बसण्यासाठी आकर्षक आसने आणि लँडस्केपिंग केलं जाणार आहे. कारंजाच्या वास्तूंची पाहणी करण्यासाठी मोठ्याप्रमाणात पर्यटक येत असल्याने आसपासच्या परिसराचे सुशोभिकरण करण्यात येत असल्याचं महापालिकेने स्पष्ट केलं आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा