Advertisement

मुंबईतील 'ही' ४ कोरोना जम्बो रुग्णालये होणार बंद

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळं जम्बो कोरोना रुग्णालयांमध्ये तुरळक रुग्ण दाखल आहेत.

मुंबईतील 'ही' ४ कोरोना जम्बो रुग्णालये होणार बंद
SHARES

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रुग्णांवरील उपचारासाठी जम्बो कोरोना रुग्णालये सुरू करण्यात आली होती. मात्र, सद्यस्थितीत मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या घटत असल्यानं अनेक निर्बंध शिथील करण्यात आलेत. अशातच आता ४ जम्बो कोरोना रुग्णालये बंद करण्याचा महापालिकेनं निर्णय घेतला आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळं जम्बो कोरोना रुग्णालयांमध्ये तुरळक रुग्ण दाखल आहेत. त्यामुळं गोरेगावचे नेस्को, मुलुंड रिचर्डसन अँड क्रूडास, कांजूरमार्ग आणि दहिसर ही जम्बो कोरोना रुग्णालये पूर्णपणे बंद करण्यात येणार आहेत.

दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख कमी होऊन आता जवळपास १५०च्याही खाली आला आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्याही १०००पर्यंत कमी झाली आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्याही कमी झाली असून, सध्या ७३९ रुग्ण दाखल आहेत, तर सुमारे ९८ टक्के खाटा रिक्त आहेत. मुंबईत कोरोना साथीच्या काळात सुरू केलेल्या ९ जम्बो रुग्णालयातील खाटा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत.

अवाढव्य खर्च असलेली ही केंद्रे बंद होणार याबाबत चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. परंतु कोणती केंद्रे बंद होणार याबाबत ठोस निर्णय नव्हता. अखेर गुरुवारी पालिकेत झालेल्या बैठकीमध्ये ४ जम्बो केंद्रे बंद करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. शहरात विभागवार १ जम्बो केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार, अंधेरी सेव्हनहिल्स रुग्णालय, वांद्रे कुर्ला संकुलातील जम्बो केंद्र, वरळीचे एनसीआय आणि भायखळ्यातील रिचर्डसन अँड क्रूडास आणि मालाड अशी चार जम्बो रुग्णालये सुरू राहणार आहेत.

बंद झालेल्या जम्बो कोरोना केंद्रातील सर्व उपकरणे आणि वैद्यकीय सामग्रीची यादी तयार केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार, उपनगरीय रुग्णालये , नव्यानं झालेली रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये इथं याचा पुरवठा केला जाणार असल्याचं समजतं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा