Advertisement

ओमिक्रॉन : ४ संशयित रुग्ण सेव्हन हिल रुग्णालयात दाखल

ओमिक्रॉन या विषाणूचा संसर्ग झालेले ४ संशयित रुग्ण मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयामध्ये दाखल झाले आहेत.

ओमिक्रॉन : ४ संशयित रुग्ण सेव्हन हिल रुग्णालयात दाखल
SHARES

ओमायक्रॉन (Omicron) या विषाणूचा संसर्ग झालेले ४ संशयित रुग्ण मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयामध्ये दाखल झाले आहेत. या रुग्णांच्या 'एच जीन'च्या चाचण्या करण्यासाठी नमुने पाठवण्यात आले आहेत. या चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर त्यांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाला आहे का, हे स्पष्ट होणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे.

परदेशातून प्रवास करून भारतात आलेल्या व्यक्तींच्या याद्या तयार करण्यात आल्या होत्या. या याद्यांच्या मदतीनं संबधित व्यक्तींशी संपर्क साधण्यात येत होता. यापैकी ४ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

यापैकी एका रुग्णाची मंगळवारी, तर ३ रुग्णांची बुधवारी नोंद झाली आहे. या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून, जिनोम चाचणीसाठी त्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. यापैकी 'एच जीन'ची चाचणी करण्यात येणार असून, त्यानंतरच त्यांना ओमायक्रॉनचा संसर्ग आहे का, हे स्पष्ट होणार आहे.

यातील एक रुग्ण हा दक्षिण आफ्रिकेमधून आला असून, अन्य तिघांनीही परदेशी प्रवास केलेला आहे. या रुग्णांमध्ये कोणत्या स्वरूपाची लक्षणं आढळतात, त्यांची तीव्रता अधिक वाढते का, याकडे वैद्यकीय तज्ज्ञांचे लक्ष आहे. या रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह येत नाहीत, तोपर्यंत त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. परदेश प्रवास करून आलेल्या व्यक्तींचे नमुने तपासण्यासाठी घेण्यात येणार असून, त्यांच्याही जिनोम चाचण्या करण्यात येणार आहेत.

मागील तीन-चार दिवसांपासून सर्वसामान्यांमध्ये प्रचंड धास्ती व काळजीचं वातावरण आहे. कोरोनाच्या नियमांचं सामान्यांनी काटेकोर पालन करावं. दुहेरी मास्कचा वापर करावा, लसीकरण झाले नसेल, तर ते अवश्य करून घ्यावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. सोशल मीडियावरून प्रसारित होणारी चुकीची माहिती, अफवा यांच्यावर विश्वास ठेवू नये. वैयक्तिक काळजी घेतल्यास सार्वजनिक आरोग्यहित साधणे शक्य आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा