Advertisement

महापालिकेच्या कार्यालयात कचऱ्यापासून गॅसनिर्मिती


महापालिकेच्या कार्यालयात कचऱ्यापासून गॅसनिर्मिती
SHARES

शहरातील कुठलीही साेसायटी असो वा कार्यालय, तेथे दररोज शेकडो टन कचऱ्याची निर्मिती होते. मात्र या कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती करण्याचा साधा विचारही कुणी आजपर्यंत केला नसेल. परंतु मुंबईत असे एक कार्यालय आहे, जिथे कचऱ्यापासून मिथेन गॅसची यशस्वीरित्या निर्मिती केली जाते. एवढेच नव्हे, तर या गॅसचा वापर कार्यालयातल्या उपहारगृहातील अन्नपदार्थ शिजवण्यासाठीही केला जात आहे. एल्फिन्स्टन स्थानकाजवळ मुंबई महापालिकेचे एफ/ दक्षिण कार्यालय असून या कार्यालयात प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबवला जात आहे.

गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेच्या एफ/ दक्षिण कार्यालयात उपहारगृह चालविण्यात येत असून या उपहारगृहात चहापानासाठी दररोज 600 ते 700 ग्राहक येतात. या सर्व ग्राहकांच्या चहापानाची व्यवस्था मिथेन गॅसवर केली जात आहे.

हे उपहारगृह चालविणारे 35 वर्षीय संतोष मेनेझेस म्हणाले, उपहारगृह चालविण्यासाठी पूर्वी आम्हाला महिन्याला 12 ते 14 एलपीजी सिलिंडरची गरज भासत होती. मात्र जेव्हापासून कार्यालयात मिथेन गॅसचा प्रकल्प सुरू झाला आहे, तेव्हापासून आम्हाला केवळ 8 ते 9 सिलिंडरचीच गरज भासते. यामुळे दिवसाला आमची किमान 200 रुपयांची बचत होत आहे.

येथे वापरण्यात येणारा मिथेन गॅस घरातील टाकाऊ खाद्यपदार्थांच्या कचऱ्यापासून तयार केला जातो. कचरा डम्पिंग ग्राऊंडवर जाण्यापेक्षा त्याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास फायदाही मिळवता येऊ शकतो, हे या प्रकल्पावरून सिद्ध होते. हा प्रकल्प एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने उभारण्यात आला असून पालिकेने केवळ जागा देण्याचे काम केले आहे, अशी माहिती एफ/ दक्षिणचे सहायक आयुक्त विश्वास मोठे यांनी दिली.

हा प्रकल्प उभारण्यास अवघ्या 60 हजार रुपयांचा खर्च आला आहे. यापैकी 40 हजार रुपये गॅस बनविणाऱ्या यंत्राच्या खरेदीसाठी आणि 20 हजार रुपये यंत्राची उभारणी करण्यासाठी वापरण्यात आले. एकूण चार स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने हा प्रकल्प पूर्ण झाल्याची माहिती पुरबिया जन विकास सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पुरबिया यांनी दिली.

मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येबरोबर घन कचऱ्यातही वाढ होत आहे. सद्यस्थितीत महापालिका दिवसाला जवळपास 10 हजार मेट्रिक टन कचरा शहरातून गोळा करते. त्याकडे पाहता कचऱ्याचा ऊर्जानिर्मितीसाठी प्राधान्याने वापर व्हायला हवा. जेणेकरून इंधन बचतीसाठी मोठा हातभार लागू शकेल. मुंबईतल्या सर्व 'एएलएम'पर्यंत हा उपक्रम पोहचवण्यासाठी ठिकठिकाणी कार्यशाळा आयोजित करण्यात येत असल्याचे महापालिकेचे 'एएलएम' अधिकारी सुभाष पाटील यांनी सांगितले.

सद्यस्थितीत मुंबईतील दररोज जवळपास 10 हजार मेट्रिक टन इतका कचरा डम्पिंग ग्राऊंडवर नेण्यात येतो. त्यातून होणाऱ्या प्रदूषणाचा फटका जवळपासच्या शहरांनाही बसत आहे. त्यामुळे सर्व मुंबईकरांनी एकत्र येऊन आपल्याकडील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली तर आपले शहर सुंदर आणि स्वच्छ राहण्यास नक्कीच मदत होईल.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा