Advertisement

दादर चौपाटीवर सर्रास चालतो जुगार

रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं संध्याकाळच्या सुमारास अनेक नागरिक दादर चौपाटीवर फिरण्यासाठी आले होते. त्याचवेळी तिथं जुगाराचा डाव रंगला होता.

दादर चौपाटीवर सर्रास चालतो जुगार
SHARES

एकाबाजुला मास्कविना फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र असं असलं तरी मुंबईतील दादर परिसरात असलेल्या चैत्यभूमी बाहेरील समुद्रकिनाऱ्यावर गर्दी जमवून सर्रास जुगाराचा खेळ चालत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. 

रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं संध्याकाळच्या सुमारास अनेक नागरिक दादर चौपाटीवर फिरण्यासाठी आले होते. त्याचवेळी तिथं जुगाराचा डाव रंगला होता. एक व्यक्ती 'पेपर व मारी बिक्सीटा'च्या सहाय्यानं जुगाराचा खेळ चालवत होता, व हा जुगार खेळण्यासाठी जवळपास २० ते २५ जणांनी गर्दी केली होती. त्यापैकी बहुतांश लोकांच्या तोंडाला मास्क नव्हते.

एरवी चौपाटीवर एकट्या दुकट्याने फिरताना मास्क नसल्यास पकडून दंडात्मक कारवाई करणारे मार्शल सापपणे कानाडोळा करत होते. याबाबत त्यांना विचारलं असता, त्यांनी थेट हातवर करत 'हा परिसर पोलिसांच्या हद्दीत येत असल्यानं आम्ही कारवाई करू शकत नाही' असं सांगितलं.

त्यानंतर, 'मुंबई लाइव्ह'च्या प्रतिनीधीनं तिथं उपस्थित असलेल्या महिला मार्शल अधिकारी यांना विचारलं असता 'शिवाजी पार्क परिसरात असलेल्या चैत्यभूमी इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दररोज अनेक अनुयायी येत असतात. शिवाय, पर्यटकही येत असतात. त्यामुळं या पर्यटकांसाठी व नागरिकांसाठी चैत्यभूमी बाहेरील समुद्रकिनाऱ्यावर खाण्यापिण्याचे स्टॉल लावण्यात आले आहेत. त्यामुळं या परिसरात नागरिक फिरण्यासाठी येत असल्यानं त्यांच्यावर कारवाई न करण्याचे आदेश महापालिकेनं दिले असल्याचे सांगितलं. तसंच, चौपाटीवर कुठलाही गैर प्रकार झाल्यास पोलिस कारवाई करत असल्याचंही स्पष्ट केलं.

त्यानंतर, बीट चौकीला माहिती दिली असता यापुढे असा कुठलाही गैर प्रकार होऊ देणार नाही. संबंधितावर कडक करावाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिलं.

कोरोना हॉटस्पॉट

मुंबई महापालिकेचे अनेक वॉर्ड हे कोरोनाचा हॉटस्पॉट होणाच्या दिशेनं आहेत. काही भागांत कडक निर्बंध लावण्याचे आदेशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळं मुंबईत पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.

२५ हजार जणांवर कारवाई करण्याचं लक्ष्य

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दर दिवशी २५ हजार जणांवर कारवाई करण्याचं लक्ष्य दिलं होतं. हे लक्ष्य महापालिकेच्या यंत्रणेला अद्याप गाठता आलेलं नाही. रुग्णसंख्या कमी होऊ लागल्यानंतर मास्क लावण्याबाबत नागरिक दक्ष नव्हते. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमी वर महापालिकेनं मास्कविना फिरणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई कठोर करण्याचं ठरवलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा